नशेमध्ये शरीरसंबंधासाठी सहमती अमान्य

0

मुंबई : दारूच्या किंवा अन्य कोणत्याही नशेत असलेल्या महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवल्यास तुम्ही चांगलेच अडचणीत येऊ शकता. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयानुसार नशेत असताना एखाद्या महिलेने शारीरिक संबंध ठेवण्यास सहमती दिली तरी त्याला वैध मानता येणार नाही असे म्हटले आहे. कारण नशेत असल्याने महिलेची मनःस्थिती वेगळी असते.

शरीरसंबंधासाठी महिला एकदाही नाही म्हणाली तर तिची इच्छा नसल्याचे मानले जाते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. याप्रमाणे जर महिला पूर्ण शुद्धीत हो म्हणाली असेल तर बलात्कार मानले जाणार नाही. पुण्यातील एका सामूहिक बलात्काराच्या प्रकरणावर सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी हा निर्णय दिला. भारतीय दंडविधानाच्या कलम 375 नुसार प्रत्येक होकाराला ग्राह्य धरता येणार नाही; त्याचप्रमाणे शारीरिक संबंधाला महिला विरोध करत नसेल याचा अर्थ तिचा होकार आहे असाही होत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.