पुणे । नसरापूर ते चांदणी चौक हा रस्ता मृत्यूचा सापळा झाला आहे. त्यावरची वाहतूक सुरक्षित व सुरळीत व्हावी यासाठी शिवसेनेच्या वतीने येत्या आठ दिवसात आंदोलन करण्यात येणार आहे. या रस्त्यावरील अपघातांची सरासरी काढली तर त्यावरील अपघातांमध्ये सरासरीने रोज एकजण मृत्युमुुखी पडत आहे. शहरप्रमुख माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी ही माहिती दिली.
कोथरूड येथील जागेवर शिवसृष्टी व्हावी
शिवसेनेचा मेट्रोला विरोध नाही, मात्र शिवसृष्टीचा ठराव ज्या जागेवर झाला आहे, त्याच कोथरूड येथील जागेवर शिवसृष्टी व्हावी ही शिवसेनेची भूमिका आहे. आम्ही त्यासाठीच आग्रही राहणार आहोत. खुद्द महामेट्रो कंपनीनेही त्यासाठी सकारात्मकता दर्शवली होती, असे मोकाटे यांनी सांगितले.
शिवसेना पद्धतीनेच आंदोलन
गेल्या काही महिन्यात शिवसेनेत मरगळ होती हे मान्य करून मोकाटे म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शहराला नवी कार्यकारिणी मंजूर केली आहे. आता शहर प्रमुख म्हणून आम्ही सर्व मिळून शिवसेनेला शहरात पुन्हा नवी ताकद निर्माण करून देणार आहोत. त्याची सुरूवात नसरापूर ते चांदणी चौक या रस्त्यासाठी आंदोलन करून करत आहोत. शिवसेनेच्या पद्धतीनेच हे आंदोलन करण्यात येईल.
अद्याप जागा संपादन नाही
यावेळी शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते संजय भोसले, नगरसेवक विशाल धनवडे, बाळा ओसवाल, संगीता ठोसर, खडकवासला विधानसभा मतदार संघाचे प्रमुख रमेश कोंडे आदी उपस्थित होते. पुलाला कठडे नाहीत, रस्ता खराब झाला आहे. महिनाभरापुर्वी उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात केली, मात्र अद्याप जागा संपादन झालेले नाही. 31 डिसेंबरपूर्वी ते झाले नाही तर पुलाला दिलेली परवानगी रद्द करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. त्याचे काय झाले याविषयी कोणीही माहिती देत नाही. त्यामुळे आता या रस्त्यासाठी आंदोलनांशिवाय पर्याय नाही असे मोकाटे यांनी सांगितले.
नगरसेवकांचे संघटनेला सहकार्य
शहराच्या हिताचे प्रश्न उपस्थित करून शिवसेना आता रस्त्यावर उतरणार आहे. सरकारमध्ये आम्ही आहोत व विरोधही करत आहोत यात काहीच विरोधाभास नाही. आम्ही जनहितासाठी काम करतो आहेत. त्याला सरकारकडून बाधा येत असेल तर त्यांच्या विरोधातही बोलण्यासाठी कचरणार नाही असे मोकाटे यांनी सांगितले. महापालिकेतील नगरसेवकांकडून संघटनेला आवश्यक ते सर्व सहकार्य मिळते आहे. त्यांनाही आंदोलनात बरोबर घेणारच आहोत असे ते म्हणाले.