कर्जत । कर्जत तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक शुक्रवारी पार पडली. त्यावेळी नांदगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आघाडीतून निवडून आलेल्या शेकापच्या अर्चना संदीप शेलवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यावेळी शेकापच्या कार्यकर्यानी जल्लोष करत नवनिर्वाचित सरपंचांचे अभिनंदन केले.
नांदगाव ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच सुलोचना साबळे यांच्यावर काही सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यांच्यावरचा अविश्वास ठराव मंजूर झाल्याने त्यांना सरपंचपदावरून पायउतार व्हावे लागले होते. तेव्हापासून नांदगाव ग्रामपंचायतीचे सरपंच पद रिक्त होते. त्या रिक्त पदासाठी शुक्रवार दिनांक 15 दिसेबर रोजी निवडणूक घेण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्या अर्चना शेलवले यांचा सरपंचपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाला होता. अन्य कोणाचाही अर्ज दाखल न झाल्याने पिठासीन अधिकारी प्रभाकर नवले यांनी नांदगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच शेकापच्या अर्चना शेलवले बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. यावेळी ग्रामसेवक एस. डी. पावर यांनी त्यांना सहकार्य केले.