नांदेड । लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या लोकांना आपल्या मूळ गावी परतण्यासाठी शासनाने परवानगी दिल्यानंतर नांदेडहून काही भाविक पंजाबमध्ये परतले होते. त्यापैकी 351 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पंजाबमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 741 वर पोहोचला आहे. या भाविकांची कोरोना तपासणी न करताच त्यांना पंजाबला रवाना केल्याबद्दल पंजाब सरकारने नाराजी व्यक्त केली आहे. याआधीही नांदेडहून पंजाबमध्ये परतलेल्यांपैकी काही जणांना कोनाची लागण झाली होती.
नांदेडमधून पंजाबमध्ये गेलेल्यांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर नांदेडमधील गुरुद्वारा, लंगर साहिब आणि संपूर्ण परिसर सील करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. गुरुद्वारा लंगर साहिब नांदेड येथील भाविकांना पंजाब राज्यापर्यंत वाहन सेवा पुरवणारे 2 वाहन चालक आणि त्यांचा 1 मदतनीस यांचाही स्वॅब अहवाल पॉझीटिव्ह प्राप्त झाला आहे. हे वाहनचालक आणि मदतनीस गुरुवार 23 एप्रिल रोजी, पंजाब येथे जाऊन मंगळवार, 28 एप्रिल रोजी परत आले होते.