जळगाव। तालुक्यातील नांद्रा बु. येथे देशी दारु दुकान बंद करण्याबाबत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी गावातील 1182 महिलांपैकी 644 महिलांनी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सहभाग घेऊन दारु बंद व्हावे यासाठी मतदान केले. शुक्रवारी 21 रोजी मतदान घेण्यात आले यात गावातील 70 टक्के महिलांनी भरपावसात मतदान करुन दारुबंदीची मागणी केली. ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव मंजुर करण्यात आला.
दरम्यान सहकारराज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन दारु दुकान बंद करण्यासंबंधी आश्वासन दिले. दहा ते 15 दिवसांपूर्वी महिलांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर मोर्चा नेवून अधीक्षकांना निवेदन दिले होत़े यावेळी महिलांनी गावातील तरुण पिडी दारुच्या नशेच्या आहारी गेली असून कुटुंब उध्वस्त होत असल्याची व्यथा मांडली. महिलांनी गुलाबराव पाटील यांच्या समोर अनुभव कथन करुन निवेदन दिले. ग्रामसभेत सरपंच विकासराव सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य, महिला, तरुणांनी उर्त्स्फुत सहभाग घेतला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस.एल.आढाव यांच्याकडे दारुबंदीचा ठराव सुपूर्द करण्यात आला आह़े
तरुण पिढी नशेच्या आहारी
नांद्रा बुद्रूक गावात 15 ते 20 वर्षापासून देशीदारु विक्रीचे सरकारमान्य दुकान आह़े हे दुकान बंद करण्यात यावे, यासाठी गावातील रहिवासी अॅड.वाघ, हिरामण वाघ, विलास चौधरी, डी.एन.पाटील, नरेंद्र पाटील, शरद सोनवणे यांच्यासह महिलांचा पाठपुरावा सुरु होता़ त्यानुसार अधीक्षक आढाव यांनी दारुबंदीसाठी गावातील मतदानाची प्रक्रिया पार पडली़ यावेळी सरपंच विकासराव सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य चुडामण वाघ, सदस्य शरद सोनवणे उपस्थित होत़े