तळेगाव पोलिसांची कारवाई; मोटारीतून नेण्यात येत होता साठा
तळेगाव : नाकाबंदी करीत असताना तळेगाव दाभाडे पोलिसांनी एका टाटा सुमो मोटारीतून नेण्यात येत असलेला सुमारे 36 हजार 520 रुपयांचा देशी विदेशी मद्याचा अवैध साठा पकडला. शनिवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी मोटार चालकाला अटक करण्यात आली असून, तळेगाव पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
मोटारीसह मद्यसाठा जप्त
तळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुगुट पाटील, हवालदार रुपनवर, पाटणकर, पोलीस नाईक कुदळे, पोलीस शिपाई झगडे, वडेकर, रणदिवे हे कर्मचारी शहरात शनिवारी सायंकाळच्या सुमारास नाकाबंदी करत होते. नाकाबंदीत पोलिसांनी (एमएच 04 इ 8976) क्रमांकाची टाटा सुमो मोटार अडवली. या मोटारीची तपासणी केली असता मोटारीत 36 हजार 520 रुपयांचा देशी विदेशी मद्याचा अवैध साठा आढळून आला. याबाबत मोटार चालकाला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी अवैध मद्यसाठा जप्त केला. या कारवाईत गाडीसह पाच लाख 36 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मोटार चालकाला अटक करण्यात आली असून, तळेगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.