नागपाडा येथे जोडप्यावर अज्ञात व्यक्तीकडून प्राणघातक हल्ला

0

मुंबई- नागपाडा येथे एका जोडप्यावर अज्ञात व्यक्तीने तिक्ष्ण हत्याराने वार करुन प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात समीरा झुल्फिकार दळवी या 40 वर्षांच्या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तिचा पती झुल्फिकार दळवी हा गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्याच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु असून या हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी हत्येसह हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला असून पळून गेलेल्या मारेकर्‍यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत. दरम्यान या हत्येमागे परिचित व्यक्तीचा सहभाग असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दुपारी उघडकीस आलेल्या या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.

ही घटना आज दुपारी दहा ते बाराच्या सुमारास नागपाडा येथील फॉरस रोडवरील साऊथ फेस चाळीत घडली. या चाळीत झुल्फिकार हा त्याची पत्नी समीरा आणि तीन मुलांसोबत राहत होता. त्याच परिसरात त्याचे पानटपरीचे एक दुकान आहे. त्याचा भाऊ नागपाडा परिसरातील एका हॉटेलमध्ये कामाला असून दुपारी बारा वाजता तो झुल्फिकारच्या दुकानात गेला होता. मात्र तो दुकानात नव्हता. त्यामुळे तो त्याच्या घरी गेला. यावेळी घरात त्याचे तिन्ही मुले नव्हते आणि घरात झुल्फिकार आणि समीरा हे दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने ही माहिती नागपाडा पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच नागपाडा पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या या दोघांनाही तातडीने पोलिसांनी जे. जे. रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे समीराला मृत घोषित करण्यात आले तर झुल्फिकारवर उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी झुल्फिकारच्या भावाच्या जबानीवरुन नागपाडा पोलिसांनी हत्येसह हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला आहे. पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी नागपाडा पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम सुरु केली आहे. या घटनेमागील कारण समजू शकले नाही. मात्र पूर्ववैमस्नातून किंवा आर्थिक वादातून ही घटना घडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.