नागपुरात श्रीलंकेवर पराभवाचे सावट

0

नागपूर । विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जमाथा येथील मैदानावर सुरु असलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात पाहुण्या श्रीलंकेच्या संघावर पराभवाचे सावट पसरले आहे. भारतीय संघाने श्रीलंकेवर पहिल्या डावात 405 धावांची आघाडी मिळवण्याबरोबर तिसर्‍या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेला दुसर्‍या डावात 1 बाद 21 असा दणका दिला आहे. खेळ संपला तेव्हा दिमुश करुणारत्ने 11 आणि लाहिरु थिरिमाने नऊ धावांवर खेळत होते. पाहुणा संघ आता 384 धावांनी पिछाडीवर आहे. तिसर्‍या दिवशी श्रीलंकेच्या दुसर्‍या डावात इशांत शर्माने भारताला पहीले यश मिळवुन दिले. इशांतने सदिरा समारविक्रमाला खाते खोलण्याची संधी मिळू न देता पॅव्हेलीयनमध्ये परत पाठवले. त्यआधी भारताने आपला पहिला डाव 6 बाद 610 धावांवर घोषीत केला. भारताने श्रीलंकेला पहिल्या डावात 205 धावांवर गुंडाळले होते. भारताकडून पहिल्या डावात चार फलंदाजांनी शतके ठोकली. कर्णधार विराट कोहलीने 213 धावा केल्या. चेतेश्‍वर पुजाराने 143, मुरली विजयने 128 आणि रोहित शर्माने नाबाद 102 धावांची खेळी केली. याआधी दोन वेळा चार भारतीय फलंदाजांनी कसोटी सामन्यातील एका डावात शतके झळकवली होती. भारतीय फलंदाजांनी 2007 मध्ये बांगलादेशातील मिरपुर कसोटीत पहिल्यांदा अशी कामगिरी केली होती. त्यानंतर भारताच्या चार फलंदाजांनी 2010 मध्ये द.आफ्रिकेविरुद्ध या कामगिरीची पुनरावृत्ती साधली. आता पुन्हा एकदा सात वर्षानंतर भारतीय फलंदाजांनी हा योग साधला.

रोहितचे चार वर्षांनंतर शतक
जमाथाच्या मैदानावर रोहीत शर्माने 160 चेंडुचा सामना करत नाबाद 102 धावा केल्या. या खेळीत त्याने आठ चौकार आणि एक षटकार ठोकला. याशतकासह रोहीतने विराट कोहलीसह नाबाद 173 धावांची भागिदारी केली. सुमारे चार वर्षानंतर रोहीतच्या नावावर कसोटी क्रिकेटमधले शतक नोंदले गेले आहे. याआधीची दोन्ही शतके रोहीतने नोव्हेंबर 2013 मध्ये वेस्टइंडिजविरुद्ध केली होती. त्यावेळी त्याने 177 आणि 111 धावांची खेळी केली होती. नागपुर कसोटीतील रोहीतचे हे शतक श्रीलंकेविरुद्धचे पहीले कसोटी शतक आहे. कोहलीचे द्विशतक, रोहीतचे शतक, भारताकडे 405 धावांची आघाडी

गावस्करचा विक्रम मोडला
कर्णधार म्हणून सर्वाधिक 11 शतकांचा विक्रम सुनील गावस्कर यांच्या नावावर होत्या. गावस्करांच्या या विक्रमाची बरोबरी विराटने कोलकाता कसोटी सामन्यामध्ये केली होती. मात्र, आता नागपूर कसोटी सामन्यामध्ये पुन्हा एक शतक लगावत विराटने गावस्करांनाही मागे टाकले आहे. या यादीमध्ये विराट, गावस्कर यांच्यानंतर नाव आहे ते म्हणजे मोहम्मद अझहरुद्दीनचे. अझहरुद्दीनने कर्णधार असताना नऊ कसोटी शतके केली होती.

सर्वाधिक द्विशतके विराट दुसरा
वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 6 द्विशतके लगावली आहेत. या यादीमध्ये विराट कोहली दुसर्‍या क्रमांकावर आहे. विराट आणि राहुल द्रविडने पाच द्विशतके तर गावस्कर यांनी चार आणि चेतेश्‍वर पुजाराने तिन द्विशतके झळकावली आहेत.

सचिनचा विक्रम मोडला
विराट कोहली सगळ्यात जलद शतक मारणार्‍या कर्णधारांच्या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीमध्ये विराटने सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. विराट कोहलीने 19वे शतक 104 डावांमध्ये पूर्ण केले. एवढी शतक झळकवायला सचिन तेंडुलकर 105 डाव खेळला होता. या या दीमध्ये पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन आहेत. ब्रॅडमन यांनी 53 डावांमध्ये एवढी शतके केली होती.

शनाकाला आयसीसीचा दणका
भारताच्या दुसर्‍या डावात विकेट घेण्यात अपयशी ठरलेला श्रीलंकेचा संघ अडचणीत आला आहे. चेंडूशी छेडछाड केल्यामुळे जलदगती गोलंदाज दसुन शनाकाला सामन्याच्या मानधनापैकी 75 टक्के रक्कम दंड म्हणून ठोठावण्यात आला. आयसीसीने कारवाई केली. सामन्याच्या दुसर्‍या दिवशी शनाका चेंडूशी छेडछाड करताना कॅमेर्‍यात कैद झाला होता. शनाकाने आयसीसीचे मॅच रेफरी डेव्हिड बून यांच्यासमोर ही चूक मान्यही केली.

लाराच्या विक्रमाचीही बरोबरी
कर्णधार असताना सर्वाधिक द्विशतके झळकवणार्‍यांच्या यादीमध्ये विराटने लाराशी बरोबरी केली आहे. कर्णधार म्हणून विराटने पाच द्विशतके केलीत तर लाराचीही एवढीच द्विशतके आहेत. कर्णधार असताना ब्रॅडमन, मायकल क्लार्क आणि ग्रॅम स्मिथ यांनी प्रत्येकी चार द्विशतके झळकावली.

सर्वाधिक शतके लगावणारे भारतीय कर्णधार
विराट कोहली- 12 शतके, 49 डाव
सुनील गावस्कर- 11 शतकं, 74 डाव
मोहम्मद अजहरुद्दीन- 9 शतकं, 68 डाव
सचिन तेंडुलकर- 7 शतकं, 43 डाव

सर्वात जलद 19 शतके बनवणारे फलंदाज
डॉन ब्रॅडमन- 53 डाव
सुनील गावस्कर – 85 डाव
मॅथ्यू हेडन – 94 डाव
स्टिव्ह स्मिथ- 97 डाव
विराट कोहली – 104 डाव
सचिन तेंडुलकर – 105 डाव