नागपुरात सर्वप्रथम ‘भरोसा सेल’ सुरू

0

नागपूर : सुभाषनगर टी पाईंट जवळील नवनिर्मित ‘भरोसा सेल’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. कौटूंबिक हिंसाचारांच्या घटनांमध्ये महिलांना न्याय देण्याच्या उद्देशाने नागपुरात सर्वप्रथम भरोसा सेल सुरू करण्यात आले आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने समाजातील हिंसेचे स्वरुप बदलत आहे. यासाठी समाजात कायद्याचे भय असणे आवश्यक आहे. नागपूर पोलीस विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या भरोसा सेलमुळे कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारास बळी पडलेल्या महिला व मुलांना अत्याचारांविरुद्ध लढण्यासाठी मानसिक बळ प्राप्त होईल. याच धर्तीवर राज्यात इतर ठिकाणीही भरोसा सेलची निर्मिती करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, बदलत्या काळानुसार पोलीस विभागाने उच्च तंत्रज्ञान व माहितीचा वापर करुन आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. पोलिस व्यवस्था जनतेच्या मदतीकरिता आहे. गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्याबरोबरच गुन्हा घडू नये, यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येतात.

शहरात स्वच्छतेवरही अधिक भर
भरोसा सेलच्या निर्मितीमागे हाच उद्देश आहे. नागपूर आयुक्तालय आणि जिल्हा मुख्यालयामार्फत अनेक नवीन उपक्रम राबविण्यात आले आहेत. डिजिटल ठाणी, सीसीटीव्ही यासारखे उपक्रम पथदर्शी आहे. तसेच पोलिसांच्या राहण्याच्या सुविधाबाबतही शासन अनुकूल आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलेची पहिली तक्रार नोंदवली. सांडपाणी, कचर्‍यापासून वीजनिर्मिती आणि प्रदूषणविरहित ग्रीन व क्लीन बस, सिमेंट रस्त्यांचे जाळे, त्यांच्या माध्यमातून खड्डेमुक्त शहर करणार आहे. मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीच्या समस्येवर मात करता येईल. कौशल्य विद्यापीठाचे लवकरच उद्घाटन करण्यात येईल. सीसीटीव्ही आणि वायफायच्या माध्यमातून देशातील सर्वांत आधुनिक शहर म्हणून नागपूरचा विकास करणार असल्याचीही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष निधीतून दक्षिण-पश्‍चिम विधानसभा क्षेत्रात नुकतेच 40 कोटी रुपये किमतीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

विजेच्या तारांचे भूमिगतीकरणाचा प्रारंभ
केंद्र आणि राज्य शासनाच्या विकासनिधीच्या माध्यमातून विजेच्या तारांचे भूमिगतीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. टप्प्याटप्प्याने हे काम पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. शहरात सांडपाण्याचे व्यवस्थापन, ओपन जीम पार्कसारखी विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. त्याचा प्रारंभ छत्रपतीनगरातून करण्यात आल्याचे सांगितले. भांडेवाडी प्रकल्पाच्या माध्यमातून सांडपाण्यापासून 18 कोटींचा महसूल मिळत असल्याचे सांगून त्यापाठोपाठ आता टाकाऊ कचर्‍यापासून वीजनिर्मिती करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नागपूर मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून शहरातील रस्ते वाहतुकीवर भविष्यात पडणारा ताण कमी होणार असून सिमेंट रस्त्यांच्या जाळेनिर्मितीमुळे खड्डेमुक्त शहराची संकल्पना प्रत्यक्षात उतरत असल्याचे ते म्हणाले.

पर्यावरणपूरक शहर निर्मितीवर भर
शहराला सीसीटीव्ही, तसेच वायफाययुक्त बनवणार आहे. नागरिकांना ग्रीन व क्लीन बसेसच्या माध्यमातून स्मार्ट वाहतूक व्यवस्था मिळणार आहे. तसेच पर्यावरणपूरक शहर निर्मितीवर भर देण्यात येत आहे. त्यासाठी दरवर्षी 300 कोटी रुपयांचा निधी देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.