नागपुरात सुमारे दीड लाख कालवडींना ब्रुसेल्लोसिसची लस

0

मुंबई । ब्रुसेल्लोसिसबाधित पशुधनापासून पशुचिकित्सकांना ब्रुसेल्लोसिस रोगाची लागण होऊ नये म्हणून नागपूर विभागात 2015-16 आणि 2016-17 मध्ये चार महिन्यांवरील व एक वर्षाखालील 1 लाख 47 हजार 568 कालवडींना ब्रुसेल्लोसिसची लस टोचण्यात आलेली आहे, अशी माहिती पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत एका प्रश्‍नाच्या लेखी उत्तरात दिली आहे. सदस्य बंटी भांगडिया, समीर कुणावार, कृष्णा गजबे यांनी यासंदर्भात प्रश्‍न विचारला होता.

रोगाचा प्रसार न होण्यासाठी उपाययोजना
1 त्यासंदर्भात जानकर यांनी पुढे माहिती दिली आहे की, 2011-12 ते 2017-18 या कालावधीत नागपूर विभागातील 14.69 टक्के पशुचिकित्सकांना ब्रुसेल्लोसिस बाधित पशुधनापासून ब्रुसेल्लोसिस हा आजार झाल्याचे आढळून आले आहे.
2 पशुधनाच्या जननेंद्रिय तपासणी व पशुप्रजननसंबंधी कामे करत असल्यामुळे त्यांना ब्रुसेल्लोसिसबाधित पशुधनापासून हा आजार होण्याची शक्यता असते. नागपूर विभागात पशुधनांना ब्रुसेल्लोसिस रोगाची लागण व त्याचा प्रसार होऊ नये म्हणून 2015-16 आणि 2016-17 मध्ये चार महिन्यांवरील व एक वर्षाखालील 1 लाख 47 हजार 568 कालवडींना ब्रुसेल्लोसिसची लसमात्रा टोचण्यात आलेली आहे.
3 पशुप्रजननासंबंधी कामे करताना बाधित जनावरांपासून या रोगाची बाधा होऊ नये म्हणून पशुचिकित्सकांना हॅन्डग्लोजचा नियमितपणे पुरवठा करण्यात येत असून, त्याचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.