संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापटांचे संकेत
नागपूर : प्रथेप्रमाणे दरवर्षी नागपूरमध्ये होणार्या हिवाळी अधिवेशनाऐवजी आता पुढील वर्षीपासून पावसाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाणार आहे. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी याबाबत सूतोवाच केले. ते विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सर्व पक्षांशी चर्चा करून निर्णय घेऊ!
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीदरम्यान तत्कालीन सी.पी. आणि बेरार प्रांतासोबत झालेल्या करारानुसार, राज्याची उपराजधानी नागपूर येथे दरवर्षी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन घेतले जाते. मात्र, आता ही परंपरा बदलून त्याऐवजी हे अधिवेशन पावसाळ्यात जुलै महिन्यात घेण्यात यावे असा एक विचार पुढे आला आहे. मार्च-एप्रिलमध्ये होणार्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर पावसाळी अधिवेशन हे सर्वाधिक काळ चालणारे अधिवेशन असते. त्यामुळे ते अधिवेशन नागपुरात घेतल्यास विदर्भातील प्रश्नांना अधिक न्याय मिळू शकणार आहे. गिरीश बापट म्हणाले की, सर्व पक्षांशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात येईल. सर्व पक्षांतील काही सदस्यांकडून याबाबत लेखी प्रस्ताव समोर आला असून, ही मागणी विचार करण्यासारखी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सर्व पक्षांशी सरकार चर्चा करेल व निर्णय घेईल असे त्यांनी स्पष्ट केले. हा निर्णय झाल्यास दरवर्षी ऐन कडाक्याच्या थंडीत नागपुरात होणार्या अधिवेशनाऐवजी जुलै-ऑगस्टमध्ये मुसळधार पावसाळ्यात नागपुरात विधिमंडळ अधिवेशन होणार असून, यामुळे राज्याच्या राजकीय, प्रशासकीय रचनेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
अधिवेशन लवकर संपवण्याचा सरकारचा घाट;
राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांचा आरोप
विदर्भासह राज्यातील इतर विभागातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणखी दोन आठवडे अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी करुनही बहुमताच्या जोरावर अधिवेशन लवकर संपवण्याचा घाट घालणार्या बेजबाबदार आणि समाजातील कुठल्याच घटकाला न्याय न देणार्या सरकारचा विरोधकांनी तीव्र शब्दामध्ये निषेध केला असल्याची माहिती विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. नागपूर अधिवेशनाच्या कामकाजासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक नागपूर येथे पार पडली. या अधिवेशनाच्या अगोदर कामकाज सल्लागार समितीची मुंबईमध्ये बैठक झाली. त्यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी नागपूरचे अधिवेशन चार आठवडे चालवावे, अशी मागणी केली होती. त्यावेळी नागपूरमध्ये अधिवेशनाच्या दुसर्या आठवड्यात बुधवारी बैठक घेवू आणि कामकाज वाढवण्यासंदर्भात निर्णय घेवू असे ठरले होते. आम्ही विरोधी पक्षाचे सदस्य बैठकीला उपस्थित होतो. या बैठकीमध्ये आम्ही अधिवेशन अजून दोन आठवडे वाढवा अशी मागणी केली. परंतु येत्या शुक्रवारीच सरकार अधिवेशन बहुमताच्या जोरावर गुंडाळणार आहे, असा आरोप पवार यांनी केला.