नागपूर: नागपुरामधील सतरंजीपुरा या दाट लोकवस्ती असलेल्या भागात रविवारी आणखी नऊ जणांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आता नागपुरातील करोना बाधितांची संख्या ७२ वर पोहचली आहे. चिंताजनक बाब म्हणजे, करोना बाधित ७२ रुग्णांपैकी जवळजवळ ४० जण हे उपचारादरम्यान मेयोत दगावलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या सहवासात आल्याने बाधित झाले आहेत.
करोनाच्या चाचणीत रविवारी पॉझिटिव्ह आलेले बहुतांशजण हे सतरंजीपूरा, मोमिनपूरा, शांतीनगर आणि कुंदनलाल गुप्त नगरातील रहिवासी आहेत. यातील काही जण बाधित रुग्णाचे नातेवाईक, शेजारी आहेत. हा रुग्ण आजारपणामुळे घरातच असताना हे नातेवाईक त्याला भेटण्यासाठी घरी गेले असता त्याच्या सहवासात आले होते. त्यामुळे करोनाची लागण होण्याची शक्यता पाहता या सर्वांना आमदार निवासातल्या सक्तीच्या एकांतवास कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने शनिवारी रात्री इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल रविवारी प्राप्त झाला. यात नऊ जणांच्या घशातील द्रवामध्ये करोना विषाणूचा अंश आढळला.