नागपूर । नागपूर शहरात गणेशोत्सवाच्या काळात स्वाईन फ्लूचे रुग्ण दिसून येऊ लागल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्यानंतर उपचार घेत असलेल्या तिघांचा मृत्यू झाला. राखी तांबोळी, भरत जायले आणि जया रक्षे अशी स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. नागपुरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारादरम्यान यांचा मृत्यू झाला. तर आणखी तीन जणांच्या चाचण्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून या महिन्यात स्वाइन फ्लूची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या आता 16 वर पोहोचली आहे. तर आणखी 13 जणांना लागण झाली आहे.
वर्षात 184 जणांना लागण
नागपूर विभागात या वर्षभरात आतापर्यंत 184 जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी आतापर्यंत स्वाइन फ्लूने दगावलेल्यांचा आकडा आता 43 वर जाऊन पोहोचला आहे. ढगाळ आणि पावसाळी वातावरणात स्वाईन फ्लूचा विषाणू अधिक काळ जिवंत राहतो. तसेच लवकर पसरतोही. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक आहे. साधा सर्दी, खोकला, ताप आला तरी त्याकडे दुर्लक्ष करू नये असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.