नागपूरात 12 तासाचे लोडशेडिग; ऊर्जामंत्र्याची माहिती

0

नागपूर । राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने दांडी मारली आहे. पाऊस न आल्याने खरीपाचे पिके करप्याला लागली आहे. जर लवकरच पावसाचे आगमन न झाल्यास शेतकर्‍यावर दुष्काळाचे सावट निर्माण होणार आहे. पाऊस नसल्याने नागपूरला पाणीटंचाई बरोबर आता लोडशेडिंगचाही सामना करावा लागणार आहे. पुढच्या आठवड्यापासून जिल्हयात दररोज फक्त 12 तास वीजपुरवठा केला जाईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलीय.

500 मिलीमिटर पावसाची नोंद
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाणी पुरवठ्याचा आढावा घेण्यात आली. पाण्याचे संकट पाहता नागपूर जिल्ह्यात 12 तास लोडशेडिंगचा निर्णय घेण्यात आलाय. 12 तास लोडशेडिंगच्या निर्णय घेण्यात आल्याने सर्वात मोठा फटका शेतकर्‍यांना बसणार आहे.ज्या शेतकर्‍यांच्या विहिरांना पाणी आहे.मात्र लोडशेडिगचा फटका त्यांना बसणार आहे.तसेच जिल्ह्यात यंदाच्या मोसमात आतापर्यंत 500 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनत चाललाय.

दुबार पेरणी करावी लागली
कमी पावसामुळे अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागली. धान पिकाच्या रोवण्या मात्र अद्यापही झालेल्या नाहीत.दुसरीकडे पावसाने दडी मारल्याने अनेक धरणातील पाणीपातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होत आहे. जिल्ह्यातील तोतलाडोह धरण कोरडे होणार आहे. परिणामी शेतकर्‍यांची स्थिती आणखीच गंभीर झाली आहे.यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली.