नागपूर कसोटीवर भारताची पकड

0

नागपूर । श्रीलंकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील कोलकाता कसोटीत अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाने दुसर्‍या नागपूर कसोटीत मात्र आश्‍वासक सुरुवात केली आहे. गोलंदाजांच्या शानदार कामगिरीमुळे भारताने दुसर्‍या कसोटीतील पहिल्याच दिवशी श्रीलंकेला 79.1 षटकात 205 धावांवर गुंडाळले. श्रीलंकेकडून कर्णधार दिनेश चंडीमल (57) आणि सलामीला आलेल्या दिमुथ करुणारत्ने (51) उल्लेखनीय फलंदाजी केली. नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डावातील पाचव्या षटकापासून श्रीलंकेच्या फलंदाजीला उतरती कळा लागली ती नंतर थांबलीच नाही.

भारताकडून फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्‍विनने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. रविंद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्माने प्रत्येकी तीन विकेट्स मिळवल्या. उत्तरादाखल पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने एक विकेट गमावुन 11 धावा केल्या होत्या. मुरली विजय आणि चेतेश्‍वर पुजारा प्रत्येकी दोन धावा काढून खेळत होते. भारताच्या पहिल्या डावाची सुरुवात लोकेश राहुल आणि मुरली विजय या जोडीने केली. सुरंगा लकमलच्या पहिल्याच चेंडुवर राहुलने खणखणीत चौकार मारला. पहिल्या षटकात भारताच्या पाच धावा झाल्या. चौथ्या षटकात भारताने लोकेश राहुलची (7) विकेट गमावली. वेगवान गोलंदाज लाहिरु गमागेने लोकेशचा त्रिफाळा उडवला. त्यानंतर मुरली विजय आणि चेतेश्‍वर पुजाराने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत संघाच्या नावावर 11 धावा जमा केल्या. पहिल्या डावात भारतीय संघ 194 धावांनी पिछाडीवर आहे.

भारतीय गोलंदाजांचा दबदबा
दुसर्‍या कसोटी सामन्यात श्रीलंकेची चांगली सुरुवात झाली नाही. सलामीचा फलंदाज सदीरा समाराविक्रमा 13 धावांवर मोहम्मद शमीच्या जागी संघात आलेल्या इशांत शर्माच्या गोलंदाजीवर बाद झाला. सदीराचा झेल पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या पुजाराने पकडला. अश्‍विनने लाहिरु थिरीमानेचा त्रिफाळा उडवला. तिरिमानेने 58 चेडूंत 9 धावा केल्या. भारताला तिसरे यश रवींद्र जडेजाने मिळवुन दिले. जडेजाने श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूजला 10 धावांवर पायचित केले. करुणारत्ने संघासाठी मोलाची भूमिका बजावताना 51 धावा केल्या. इशांत शर्माने त्याला पायचित केले. निरोशन डिक्वेला जडेजाचा दुसरा बळी ठरला. डिक्वेलाच्या 24 धावा झाल्या असताना शर्माने त्याचा झेल पकडला. दशुन शनाकाचा त्रिफाळा अश्‍विनने उडवला. त्यानंतर दिलरुवान परेराला (15) जडेजाने पायचित केले. खेळपट्टीवर ठाण मांडून बसलेल्या दिनेश चंडीमलला (57) अश्‍विनने पायचित केले. सुरंगा लकमलची (17) विकेट इशांत शर्माने मिळवली. त्यानंतर अश्‍विनने रंगना हेरथची विकेट मिळवत श्रीलंकेचा डाव संपुष्टात आणला.

संघात तीन बदल
भारताने नागपूर कसोटीसाठी संघात तीन बदल केले आहेत. बहिणीच्या लग्नासाठी सलामीवीर शिखर धवनने माघार घेतल्यामुळे अपेक्षेप्रमाणे मुरली विजयला संधी देण्यात आली आहे. याशिवाय किरकोळ दुखापतीमुळे मोहम्मद शमी बाहेर पडला आहे, त्याच्या जागी ईशांत शर्माची निवड झाली आहे. तर बोहल्यावर चढल्यामुळे भुवनेश्‍वर कुमार दुसर्‍या आणि तिसर्‍या कसोटीला मुकणार आहे. त्यामुळे त्याच्या जागी कोणी गोलंदाज खेळवण्याऐवजी विराट कोहलीने रोहित शर्माला पसंती दिली आहे.

संक्षिप्त धावफलक
श्रीलंका : 205 (दिनेश चंदिल 57, दिमुथ करयुरत्नने 51, रविचंद्रन अश्‍विन 4-67, रवींद्र जडेजा 3-56, इशांत शर्मा 3-37)
भारत : 11/1 (लाहिरू 1-4) 1 9 4 धावांनी आघाडी