नागपूर-मुंबई व मुंबई-दिल्ली व्हाया राजधानी एक्स्प्रेस महिनाभरात धावणार

0

खान्देशातील प्रवाशांना दिलासा ; माजी मंत्री व खासदारांच्या पाठपुराव्याला यश

भुसावळ- भुसावळ मुंबई व्हाया नंदुरबार ही नवीन रेल्वे येत्या महिन्याभरात सुरू होणार असून मुंबई-दिल्ली व्हाया भुसावळ या राजधानी एक्सप्रेससह नागपूर ते पुणे संपूर्ण वातानुकूलित हमसफर एक्सप्रेससुद्धा येत्या महिन्याभरात सुरू करण्याचे आश्‍वासन रेल्वे मंत्र्यांनी दिले. माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे व खासदार रक्षा खडसे यांनी गुरूवारी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेत जिल्ह्यातील रेल्वे संदर्भातील विविध प्रश्नांविषयी चर्चा केली. जळगाव जिल्ह्यातील नवीन रेल्वे, रावेर, मलकापूर येथील थांबे मिळण्यासंदर्भत चर्चा करण्यात आली. भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे उपस्थित होते.

भुसावळ-पुण्यासाठी नवीन एक्स्प्रेस
भुसावळ ते पुणे आणि भुसावळ ते मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे सुरू व्हावी म्हणून खासदार रक्षा खडसे यांचा पाठपुरावा सुरू असून भुसावळ ते पुणे नवीन एक्सप्रेस सुरू करण्यासही रेल्वे मंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. रावेर येथे महानगरी एक्सप्रेसला थांबा व अजमेर हैद्राबाद गाडीला भुसावळ स्थानकावर थांबा मिळण्याची खासदारांनी मागणी केली मात्र तांत्रिक अडचणीमुळे तो थांबा मलकापूर येथे देण्याचे याप्रसंगी मान्य करण्यात आले तसेच पाचोरा ते जामनेर ही नॅरो गेज बोदवडपर्यंत नेण्याचे सुद्धा तत्वतः मान्य केले.

पॅसेंजरची समस्या सोडवण्याची मागणी
भुसावळ रेल्वे स्थानकावरील नवीन प्लॅटफॉर्म सुरू होण्यासंदर्भात कमिशन ऑफ रेल्वे सेफ्टीकडून परवानगी मिळण्यासंदर्भातील प्रस्ताव शेवटच्या टप्प्यात असून पुढील 15 दिवसात हिरवा कंदील मिळणार आहे तर जळगाव ते भुसावळ तिसर्‍या लाईनचे काम पूर्ण झाले असून या नवीन प्लॅटफॉर्मला तिसरी लाईन जोडणे कामी यार्डात रीमोल्डिंगचे काम सुरू केल्यास मुंबई व सुरतकडे जाणार्‍या वाहतुकीचा ट्रॅफिक लोड कमी होईल आणि अत्यंत व्यस्त अशा भुसावळ स्थानकावर पॅसेंजर गाड्या लेट होतात ती अडचण दूर होऊन रावेर ते जळगाव रोज अप-डाउन करणार्‍या हजारो प्रवाशांना दिलासा मिळेल, असे प्रसंगी खडसे म्हणाल्या.

कोच फॅक्टरीत स्थानिकांना मिळावी संधी
भुसावळ येथील प्रस्तावित कोच फॅक्टरीत भरती करताना स्थानिकांना व बेघर झालेल्या अतिक्रमणधारकांना प्राधान्य देऊन रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि खासदार रक्षा खडसे यांनी केला असता याबाबत सकारात्मक दखल घेण्याचे आश्‍वासन रेल्वेमंत्र्यांनी दिले. भुसावळ येथे येत्या दोन महिन्यात रेल्वेमंत्री बोदवड, सावदा, निंभोरा उड्डाणपुलाच्या भूमिपूजन व भुयारी मार्गाचे भूमिपूजनयेणार असल्याचे त्यांनी सांगितले.