नागपूर रेल्वे स्थानक पार्किंगचे दर दुप्पट

0

नागपूर । रेल्वे स्थानकावर संत्रा मार्केटच्या बाजूने असलेल्या वाहन तळावर पार्किंगचे दर दुप्पट करण्यात आल्याने वाहन चालकांमध्ये असंतोष आहे. येथील पार्किंगचे कंत्राट अलीकडेच नव्याने देण्यात आले आहे. त्यातील नवे दर सर्वसामान्य वाहनचालकांवर अन्याय करणारे असल्याची प्रवाशांची भावना आहे.

संत्रा मार्केटकडील पार्किंगचा कंत्राटदार जुलै 2016 मध्येच हे कंत्राट सोडून गेला होता. त्यामुळे रेल्वे प्रशासन स्वतःच ही व्यवस्था पाहात होते. जुलै 2016 ते मार्च 2017 अशी नऊ महिने ही जबबादरी रेल्वे प्रशासनाने सांभाळली. आता पार्किंगचे नवे कंत्राट देण्यात आले आहे मात्र त्यात दर दुप्पट करण्यात आले आहे. पूर्वी 6 तासांसाठी 5 रुपये लागायचे आता 8 तासांसाठी 10 रु. द्यावे लागत आहेत. वास्तविक स्थानकावर कुणीही तीन तासांपेक्षा अधिक काळासाठी जात नाही. विशेष म्हणजे प्लॅटफॉर्म तिकीट कमीत कमी 3 तासांचे दिले जाते पण पार्किंग मात्र कमीत कमी 8 तासांचे करावे लागते ही विसंगती का, हा प्रश्नच आहे.