नागपूर लोहमार्गचे विभाजन ; औरंगाबाद आता स्वतंत्र विभाग

0

गुन्हे वाढल्याने गृह विभागाचा निर्णय ; मनमाड व जालन्यासाठी स्वतंत्र उपअधीक्षक

भुसावळ (गणेश वाघ)- तब्बल 58 वर्षानंतर नागपूर लोहमार्गचे विभाजन झाले असून औरंगाबाद आता स्वतंत्र जिल्हा (विभाग) जाहीर करण्यात आला आहे. कार्यक्षेत्रातील वाढते गुन्हे व मोठी असलेली हद्द पाहता राज्याच्या गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद जिल्ह्यांतर्गत आता मनमाड व जालन्यासाठी स्वतंत्र उपअधीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असून औरंगाबादसाठी स्वतंत्र पोलीस अधीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी गृह विभागाचा निर्णय
राज्यातून गेलेल्या रेल्वेसाठी पुणे व नागपूर हे रेल्वेचे मुख्य कार्यालय होते तर मुंबई शहर स्वतंत्र ठेवून तेथे सीपींची (कमिश्‍नर) नियुक्ती करण्यात आली होती मात्र रेल्वेचे वाढते कार्यक्षेत्र व दिवसागणिक वाढलेली गुन्ह्यांची संख्या पाहता नियंत्रण करताना पोलीस प्रशासनाची दमछाक उडत होती. त्यासाठी नागपूर लोहमार्गचे विभाजन करण्याची मागणी सातत्याने होत होती व त्याची दखल घेत राज्याचे अपर पोलीस महासंचालक यांनी 7 मार्च 2018 रोजी घेत लोहमार्ग नागपूरमधील नाशिक व औरंगाबाद भाग वेगळा करून औरंगाबाद विभाग स्वतंत्र करण्यासंदर्भात प्रस्ताव राज्याच्या गृह विभागाला सादर केला होता. त्याची दखल गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी घेत औरंगाबाद विभागाच्या स्वतंत्र निर्मितीला मंजुरी दिली आहे.

तीन विभागात विभागला गेला लोहमार्ग
गृह विभागाच्या नवीन धोरणानुसार तीन विभागात लोहमार्ग विभागला गेला आहे. पुणे विभागांतर्गत पुणे उपविभागात पुणे, दौंड, अहमदनगर तर सोलापूर उपविभागात सोलापूर, कर्डूवाडी, मिरज तर नागपूर विभागातील नागपूर उपविभागांतर्गत गोंदिया, इतवारी, नागपूर तसेच नव्यानेच अकोला उपविभागाची निर्मिती करण्यात आली असून त्यात अकोला, वर्धा, बडनेरा त्यात समाविष्ट करण्यात आले आहे शिवाय नवनिर्मित औरंगाबाद विभागांतर्गत मनमाड उपविभागात शेगाव, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, नंदुरबार, नाशिकरोड, ईगतपुरीचा समावेश करण्यात आला आहे शिवाय जालना स्वतंत्र उपविभाग राहणार असून त्यात औरंगाबाद, नांदेड, परळी वैजनाथचा समावेश करण्यात आला आहे.

नाशिक अकादमीतील एसपींना औरंगाबादची संधी
औरंगाबाद लोहमार्गच्या पोलीस अधीक्षक पदासाठी नाशिक अकादमीतील तीन पैकी एका पोलीस अधीक्षकांना संधी दिली जाणार आहे तसेच पांढरकवडा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील एका अधिकार्‍याची अकोला उपअधीक्षकपदी निवड केली जाणार आहे तर अन्य रीक्त पदे नागपूर लोहमार्गमधील उपलब्ध अधिकार्‍यांमधून भरण्यात येणार आहेत.

जळगावसह शिर्डीतील पोलीस ठाणे प्रस्तावित
भुसावळ विभागातील जळगाव व मनमाड विभागातील शिर्डी येथे हल्ली औट पोस्ट आहेत मात्र प्रवाशांची वाढती संख्या व दाखल होणार्‍या गुन्ह्यांचे प्रमाण पाहता येथे पोलीस ठाण्याला मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. तूर्त हा प्रश्‍न प्रलंबित असून लवकरच मात्र याबाबतचाही तिढा सुटणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.