नागपूर व वर्धा पॅसेंजर दहा दिवस रद्द

0

ऐन सणासुदीत रेल्वे प्रवाशांचे हाल ; अन्य पॅसेंजर गाड्यांचा दिलासा

भुसावळ- विविध तांत्रिक कामांच्या नावावर तब्बल दोन महिन्यांपासून पॅसेंजर गाड्या रद्द झाल्याने रेल्वे प्रवाशांच्या गर्दीच्या हंगामात मोठे हाल सोसावे लागत असतानाच रविवारी काही गाड्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्यानंतर दुसर्‍यादिवशी सोमवारी पुन्हा नागपूरसह वर्धा पॅसेंजर तांत्रिक कामांमुळे तब्बल दहा दिवस रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने रेल्वे प्रवाशांच्या तीव्र संताप व्यक्त होत आहे. आधीच रेल्वे गाड्यांना फुल्ल गर्दी असताना पुन्हा सातत्याने पॅसेंजर गाड्या रद्द करून सर्वसामान्य प्रवाशांचे हाल केले जात असल्याची भावना व्यक्त हेात आहे.

पॅसेंजर गाड्यांचा दिलासा
रविवारी रेल्वे प्रशासनाने सकाळची भुसावळ-मुंबई, सायंकाळची भुसावळ-देवळाली, भुसावळ-कटनी, भुसावळ-सुरत, भुसावळ-नरखेड आदी पॅसेंजर गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने या मार्गावरील चाकरमान्यांसह रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेल्या रेल्वे गाड्यांच्या पार्श्‍वभूमीवर पॅसेंजर गाड्या आता नियमित सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

नागपूर व वर्धा पॅसेंजर दहा दिवस रद्द
नागपुर रेल्वे विभागातील सेवाग्राम, वर्धा सेक्शनमध्ये तांत्रिक कामासाठी 4 एप्रिल ते 15 मे दरम्यान विशेष ब्लॉक घेतला जात असून या कामांच्या अनुषंगाने 6 ते 15 एप्रिलदरम्यान गाडी क्रमांक 51286 अप नागपुर-भुसावळ पॅसेंजर तसेच 51285 डाउन भुसावळ-नागपूर पॅसेंजर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच 51261 डाउन अमरावती-वर्धा पॅसेंजर तसेच 51262 अप वर्धा-अमरावती पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे.