नवी दिल्ली: लोकसभा, राज्यसभेट नागरिकत्व कायदा पास झाल्यानंतर देशातील अनेक संघटना, विद्यापीठ, पूर्वोत्तर राज्यात विरोध होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका कार्यक्रमात या विषयी त्यांनी माहिती दिली. ‘देशात ४०० हून अधिक विद्यापीठं आहेत. नागरिकत्व कायद्याविरोधात फक्त २२ विद्यापीठांमध्ये निदर्शनं झाल्याची अधिकृत माहिती आहे. त्यातही फक्त चार विद्यापीठांमध्ये विरोध तीव्र आहे. त्यामुळे कायद्याला फार मोठा विरोध होत असल्याचे भासवून कुणी बढाया मारू नये,’ असं शहा यांनी विरोधकांना सुनावले आहे.
सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशात अनेक ठिकाणी निदर्शनं सुरू आहेत. काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळं तापलेल्या राजकारणावर शहा यांनी यावेळी भाष्य केलं. ‘हा कायदा अंमलात आणण्याचा सरकारचा निर्धार पक्का आहे. कितीही राजकीय विरोध झाला तरी माघार घेतली जाणार नाही,’ असं अमित शहा यांनी ठणकावलं आहे. ‘जामिया मिलियामध्ये पोलिसांनी केलेली कारवाई ही हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी होती,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
‘देशात ४०० हून अधिक विद्यापीठं आहेत. नागरिकत्व कायद्याविरोधात देशातील फक्त २२ विद्यापीठांमध्ये निदर्शनं झाल्याची अधिकृत माहिती आहे. त्यातही केवळ अलिगड मुस्लिम विद्यापीठ, जामिया मिलिया, लखनऊ आणि जेएनयूमध्ये विरोध तीव्र आहे. त्यामुळं मोठा विरोध होतोय असं म्हणून विनाकारण कुणी यास हवा देऊ नये,’ असं शहा म्हणाले.
‘जामिया मिलियामध्ये हिंसाचार करणाऱ्यांवरच पोलिसांनी कारवाई केली आहे. जामियामध्ये जे घडलं तो प्रकार गंभीर होता. दगडफेक नेमकी कुठून झाली याची चौकशी सुरू आहे. विद्यार्थ्यांशिवाय तिथं बाहेरचेही काही लोक होते. बस जाळल्या गेल्याचे व्हिडिओ फूटेजही आहेत. अशी परिस्थिती कशी नियंत्रणात आणायला हवी? पोलिसांनी परिस्थिती अधिक बिघडण्याची वाट पाहत बसावं असं अपेक्षित आहे का,’ अशी विचारणाही शहा यांनी केली. कुठल्याही प्रकारची हिंसा खपवून घेतली जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.