जळगाव। वाघूर रॉ वॉटर पंपिंग स्टेशन व उमाळा येथील जलशुद्धीकरण केंद्राचा शनिवारपासून वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरण व पाणीपुरवठा विभागातर्फे वीजपुरवठा सुरळीत करण्याचे युद्धपातळीवर काम करून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. बुधवारी सकाळी 8.30 वाजता वीज पुरवठा सुरळीत झाल्याने उमाळा जलशुद्धीकरणातील पहिला पंप सुरू करण्यात आला. रविवारी दुपारी वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला परंतु पून्हा वीजपुरवठा खंडित झाल्याने सोमवारी शहरातील काही परिसरात पाणीपुरवठा हा कमी दाबाने व उशिरा झाला होता. त्यातही नियोजित हरिविठ्ठलनगर, खोटेनगर, पिंप्राळा या परिसरात पाणीपुरवठा हा झाला नसल्याने त्या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. रविवारचा बॅक लॉग भरून काढण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
गिरणापंपिंगमध्ये सोडले पाणी
जलशुद्धीकरणासाठी 6 पंप आहेत. यातील 4 पंपांच्या सहाय्याने वाघूर रॉ वॉटर पंपिंग स्टेशन येथून सकाळी 8.30 वाजता पाणी आणण्यात आले. मुख्य साठवण टाकी ही 260 लाख लिटर क्षमतेची आहे. या टाकीतून गिरणा पंपिंग स्टेशनला पाणी सोडण्यात आले. यासाठी 2 तासाचा कालावधी लागला. तसेच रविवार 4 जून रोजी खंडेरावनगर, पिंप्राळा, खोटे नगर येथे नियमीत पाणी पुरवठा झालेला नाही. यामुळे मुख्य टाकीतून गिरणा पंपिंगला पाणी सोडले जात असतांना खंडेरावनगर, पिंप्राळा, खोटे नगर येथील टाक्या भरण्यात आल्या.
बरमुडावर नागरिक पालिकेत
गेल्या पाच दिवसांपासून पाणी न मिळाल्याने शहरातील नागरिक हैराण झाले होते. सलग चार दिवस पाणीपुरवठा न झाल्याने पाचव्या दिवशी त्यांचा सयंम सुटला. काही नागरिकांनी पाणी केव्हा येणार याची विचारणा करण्यासाठी आयुक्त कार्यालयात धाव घेतली. यावेळी त्यांनी आयुक्तांचे स्वीय सहाय्यकांना पाणी केव्हा येणार आहे याची विचारण केली. विचारणा करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी बर्मुंडावरच आयुक्त कार्यालय गाठले होते.
नगरसेवकांद्वारे टँकरद्वारे पाणी पुरवठा
गेल्या पाच दिवसांपासून शहरात पाणीपुरवठा न झाल्याने नगरसेवकांनी आपपल्या वार्डांत टँकरद्वारे पाणी पुरवठा केला. यात सुनील महाजन यांनी 6 टँकरद्वारे शहरास पाणी पुरवठा केला. तर कैलास सोनवणे, शरद तायडे, नितीन बरडे, विष्णु भंगाळे, संतोष पाटील सुनील चुडामण पाटील, यांनी प्रत्येकी एका टँकरद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा केला. तर महापालिकेने 3 टँकरद्वारे शहरात पाणी पुरवठा केला. तसेच चौघुले प्लॉट येथे अशोक चौधरी यांनी बोअरिंगद्वारे पाणी वाटप केले.
शाहू नगरात खाजगी बोरींगद्वारे पाणीवाटप
शहरातील नागरिकांना गेल्या पाच दिवसांपासून पाणी न मिळाल्याने पाण्यासाठी भंटकंती करावी लागली. काही नागरिकांनी शूद्ध पाण्याचे जार विकत आणून आपली गरज भाघवली. तर झोपडपट्टी भागातील नागरिकांना भटकंती करूनही पाणी मिळत नव्हते. शाहू नगरातील एका नागरिकांने रमजान महिन्याचे औचित्य साधत पाण्याचे वाटप केले. या नागरिकाने आपल्या खाजगी बोरींगद्वारे शाहू नगरातील रहिवाशांना पाणी वाटप केले. पाणी मिळत असल्याचे परिसरात समजल्यावरे बोरींगद्वारे मिळणारे पाणी भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
आज होणारा पाणी पुरवठा
वाल्मिकनगर, कांचननगर, दिनकरनगर, आसोदा रोड व परिसर, मेहरूण, रामेश्वर कॉलनी, एमडीएस कॉलनी, मास्टर कॉलनी, अक्सानगर, अयोध्यानगर, शांतीनिकेतन, गृहकुल कॉलनी, म्हाडा कॉलनी, अजिंठा सोसायटी, नित्यानंदनगर टाकी परिसर, मोहननगर, नेहरूनगर, खंडेरावनगर, हरिविठ्ठलनगर, पिंप्राळा गावठाण, मानराज टाकीवरील भाग, दांडेकरनगर, मानराज पार्क, आसावानगर, निसर्ग कॉलनी, द्रौपदीनगर, मुक्ताईनगर, धनश्रीनगर, पोलिस कॉलनी परिसर, खोटेनगर, शिवाजीनगर हुडको, प्रजापतनगर, एसएमआयटी परिसर, योगेश्वरनगर, हिरा पाईप व शंकररावनगर, खेडीगाव परिसर, डीएसपी बायपास, तांबापुरा, श्यामाफायर समोरील परिसर, वाघनगर, हरिविठ्ठलनगर, शिवकॉलनी, विद्युत कॉलनी, राका पार्क, पोस्टल कॉलनी, विवेकानंदनगर व इतर भाग, जिल्हा रोड, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, महाबळ कॉलनी, ऑफिसर क्लब टाकी परिसर ठिकाणी आज पाणी पुरवठा होणार आहे.
उद्या होणारा पाणीपुरवठा
खंडेरावनगर, पिंप्राळा गावठाण उर्वरित भाग, पिंप्राळा हुडको, सेंट्रल बँक कॉलनी, आशाबाबानगर, मानराज टाकी परिसर, शिंदेनगर, अष्टभूजा, वाटिकाश्रम, खोटेनगर टाकीवरील राहिलेला भाग, निवृत्तीनगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिराशिवा कॉलनी, आहुजानगर, निमखेडी, नित्यानंदनगर, संभाजीनगर, रायसोनीनगर, समतानगर, डीएसपी टाकी, सानेगुरूजी कॉलनी, पार्वतीनगर, शिवरामनगर, यशवंतनगर, भगवाननगर, रामानंदनगर, कोल्हेनगर, अंबिका सोसायटी, शिवकॉलनी व इतर परिसर, गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी परिसर ठिकाणी उद्या पाणीपुरवठा होणार आहे.