नागरिकांचे प्रश्‍न त्यांच्या गावातच सोडवावेत

0

सांगली । शासकीय विभागांनी शासन आपल्या दारी उपक्रमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्‍न त्यांच्या गावातच सोडवावेत, अशा सूचना कृषि आणि पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिल्या. इस्लामपूर येथे आयोजित वाळवा तालुक्यातील शासकीय विभागांच्या तालुकास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, वाळवा तहसीलदार नागेश पाटील, कृषि उपसंचालक मकरंद कुलकर्णी, गटविकास अधिकारी राहुल रोकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

विकासकामे वेळेत पूर्ण करा
कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, कोणत्याही तक्रारीमुळे विकास कामाला खिळ बसू नये यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून विकास कामे विहीत वेळेत पूर्ण करावीत. कोणत्याही प्रकारे सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. शॉर्ट सर्किटमुळे ज्या शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, अशा ठिकाणी जाऊन त्वरीत पंचनामे करावेत व नुकसान भरपाईसाठीचा प्रस्ताव सादर करावा. ज्या विद्युत ट्रान्सफॉर्मरवर लोड कमी आहे त्या ट्रान्सफॉर्मरवरून शक्य असेल तेथे शेतकर्‍यांना विद्युत कनेक्शन द्यावे. समाधान मेळाव्याच्या माध्यमातून नागरिकांच्या अडीअडचणी सोडवाव्यात. जिल्ह्याला मार्गदर्शक ठरेल असे कृषि प्रदर्शन आयोजित करण्याच्या सूचना देऊन वारस नोंदणीचा कार्यक्रम राबवविण्याच्या सूचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या.
यावेळी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जलयुक्त शिवार अभियान, कृषि यांत्रिकीकरण, आरोग्य, शेडनेट पॉली हाऊस, महाराजस्व अभियान,यासह विविध शासकीय  योजना प्राधान्याने राबवून विहीत मुदतीत कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.