तळोदा । नगरपालिका प्रशासनाची कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी न घेता, उघडपणे पैसे घेऊन प्रधानमंत्री आवास योजनेचे ऑनलाईन अर्ज भरणार्यांना शिवसेनेचा आक्रमक भूमिकामुळे संबंधितांना पैसे परत करण्यात आलेत. त्यामुळे अनेक गोर – गरीब, कष्टकरींना दिलासा मिळाला व त्यांची आर्थिक लूट थांबली. विशेष म्हणजे कालच सेनेचे जितेंद्र दुबे यांनी जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. तरी पण काही महाभाग अश्या प्रकारे गरीब जनतेला लुबाडण्याचे धाडस दाखवित होते, त्यामुळे त्यांचामागे नक्कीच मोठया व्यक्तींचे पाठबळ असेल अशी चर्चा उपस्थित गोर गरीब जनतेमध्ये रंगत होती होती.
आवास योजनेचे फलक लाऊन फसवणूक
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तळोदा शहरातील खान्देशी गल्लीत दोन तरुण एका भाड्याचा खोलीत पंतप्रधान आवास योजनेचे फलक लावून गरीब, कष्टकरींकडून पैसे घेऊन सदर योजनेचे अर्ज भरुन घेत होते. याबाबत शिवसेनेचे जितेंद्र दुबे व आनंद सोनार यांना माहिती मिळताच त्यांनी आज सकाळी 11 वाजेचा सुमारास उन्हात रांगेत उभे असलेल्या महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांना त्या ठिकाणी गरीब महिलांची आर्थिक पिळवणूक होत आहे हे लक्षात येताच त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला व संबंधित घटनेची विस्तृत माहिती दिली. नंतर सेनेचे पदाधिकारी व उपस्थित महिलांनी प्रत्यक्ष मुख्याधिकारी यांचे दालन गाठले व सदर बाब त्यांचा लक्षात आणून दिली. संबधित विषयाची गंभीर दखल घेत मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी दोघांची विचारपूस केली. यावेळी मुख्याधिकारी पवार यांना त्या तरुणांकडे सदर योजनेचे कुठल्याही प्रकारचे आदेश अथवा परवानगी नसल्याचे आढळून आले, त्यामुळे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचे मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी सांगितले.
महिला आक्रमक
त्यानंतर शिवेसनेने तात्काळ गोर – गरिबांचे पैसे परत करा असा आग्रह धरून संबंधीतला पैसे देण्याचे सांगितले, मात्र सदर व्यक्तीजवळ पुरेसे पैसे नसल्याने त्यांनी ठराविक महिलांनाच पैसे दिलेत आणि उर्वरितांना पैसे नंतर आणूंन देतो असे सांगितले. संबंधित व्यक्ती पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे पाहून उपस्थित महिला आक्रमक होऊन संबंधितावर धावून जाण्याचा प्रकार घडला. त्यामुळे पालिकेचा आवारात कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होत असल्याचे हेरुन पालिका प्रशासनाने तात्काळ पोलिसांना प्राचरण करून संबंधितांना त्यांचं ताब्यात देण्यात आले. याचदरम्यान आदिवासी युवा शक्तीच्या विनोद माळी, विवेक पाडवी, योगेश पाडवी, सुनील पाडवी, अभय वळवी व चेतन शर्मा यांनी सुद्धा याचप्रकारे ऑनलाईन फॉर्म भरुन फसवणूक करणार्या दोन व्यक्तीस पोलिसांच्या ताब्यात दिले. यावरुन तळोदा पोलीस ठाण्यात उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती
प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत गरीबांना घरे मिळणार आहेत असे आम्हाला सांगण्यात आले आणि आमच्याकडून संबंधितांनी पैसे घेवून फॉर्म भरुन घेतलेत. त्यामुळे मी स्वतःचे घर मिळणार या आशेने आर्थिक परिस्थिती नसतांना सुद्धा, फॉर्म भरण्यासाठी पायातले जोडवे विकले तसेच रोजंदारी बुडवित दोन दिवसांपासून फॉर्म भरण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु आज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा सजगतेमुळे सदर प्रकार वेळीच माझा लक्षात आला आणि माझी आर्थिक लूट होता होता थांबली.
– प्रमिलाबाई वेणीलाल पाडवी