नागरिकांना सजग, सावध करण्यासाठी पोलीस दलातर्फे ‘जागरुक नागरिक’ मोहिम

0

जिल्ह्यात सर्व पोलीस ठाण्यांमध्ये राबविणार मोहिम : पथकांव्दारे सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन

जळगाव- गुन्हे कमी करण्यासह नागरिकांना स्वतःचे रक्षण करता यावे, यादृष्टीने राज्यभरात जागरुक अभियान राबविण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिले आहे. त्यानुसार आगामी काळात जिल्ह्यातही ही जागरुक अभियान राबविण्यात येणार असून त्याबाबच्या सुचना व आदेश पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी गुरुवारी काढले आहेत. या मोहिमेत नागरिक ांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी मार्गदर्शन, व्हॉटस्गृप या माध्यमातून पावले उचलली जाणार आहेत. या मोहिमेमुळे कारभारात नागरिकांची पोलिसांना मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे.

काय जागरुक अभियानाचा उद्देश
स्थानिक स्वराज्य संस्था व त्यांचे प्रतिनिधी यांचेशी समन्वय साधून त्यांचा उपयोग गुन्हे कमी करण्याासठी तसेच कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी केला जाईल, नागरिकांना गुन्ह्यापासून स्वतःचे संरक्षण करता यावे, यासाठी मार्गदर्शन शिबिर घेणे. या मार्गदर्शनातून नागरिकांना सोनसाखळी चोरी, रस्त्यावरील गुन्हे, अंमली पदार्थ विरोधी गुन्हे, महिला लहान मुलांसोबत घडणारे गुन्हे, सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शन केले जाणार

अधिकारी व कर्मचार्‍यांचे पथकाकडून मोहिम
पोलीस ठाणे स्तरावर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे मोहिमेसाठी पथक तयार करण्यात येईल. त्या पथकातर्फे गृहनिर्माण संस्था, शासकीय कार्यालय, मॉल्स, मल्टिप्लेक्स व मोठी रुग्णालये या ठिकाणी नागरिकांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नागरिकांनी त्यांच्या परिसरात, भागात घडणार्‍या घटनांविषयी पोलिसांनी माहिती कळवावी, यासाठी पथकाकडून त्यांना उद्युक्त करण्यात येईल. पथकाच्या प्रमुखाने नागरिकांचा व्हॉटस् अ‍ॅप गृप त्यातून समन्वय साधावा. तसेच मोठ मोठी अपार्टमेंट यांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासह वॉचमन नियुक्ती करण्याबाबत सुचना करण्यात येणार आहे.

जिल्हा विशेष शाखेला द्यावा लागणार कामगिरीचा अहवाल
प्रत्येक ठिकाणी पोलिसाला पोहचता येत नाही, आहे त्या मनुष्यबळात सर्व ठिकाणी लक्ष देणे पोलीस विभागाला अवघड आहे. यासाठी नागरिकांना सजग, सावध कमरुन त्याच्या सहभागातून वाहतूक कोंडीसह विविध अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याचप्रकारे गुन्ह्यांना पायबंद कसा, घालता येईल, घडलेला गुन्हा कसा उघडकीस येईल, याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पथकाला केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरिक्षक यांना सादर करावा लागणार आहे.