नागरिकांनो लसीकरणाआधी रक्तदान करा…!

लसीकरणानंतर तीस ते चाळीस दिवस करता येणार नाही रक्तदान

जळगाव। कोरोनाची लस घेतल्यानंतर पुढचे तीस ते चाळीस दिवस नागरिकांना रक्तदान करता येणार नाही. त्यासाठी लसीकरण करण्याआधीच नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन शहरातील विविध ब्लड बँकांतर्फे करण्यात येत आहे. व्हाट्सअ‍ॅपवर किंवा सोशल नेटवर्किंग साईटवर काहीही मेसेजेस फिरत असतील त्यांना कित्येकदा आपण खोटे समजून टाळतो. मात्र, लसीकरणानंतर रक्तदान करू नका, असा मेसेज सोशल नेटवर्किंग साईटवर फिरत आहे. हा मेसेज खोटा नसून त्यात शंभर टक्के सत्यता आहे. यासाठी नागरिकांनी लसीकरणाआधी रक्तदान करणे गरजेचे आहे.

लसीकरणाआधी रक्तदान करणे गरजेचे
मे महिन्याच्या पहिल्या दिवसापासून देशातील 18 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी देशात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. अशा वेळेस लसीकरणानंतर रक्तदान करायचे की नाही? असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहेत. मात्र, लसीकरण केल्यानंतर शरीरात प्रतिपिंड (अँटीबॉडी) तयार होतात. अशा वेळेस रक्तदान करणे अतिशय चुकीचे आहे. रक्तदान केलेल्या रुग्णावर त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.

यंदा रक्तदानाचे प्रमाण कमी
दरवर्षी नागरिक रक्तदान करायला भरपूर प्रतिसाद देतात. मात्र, यंदा कोरोनाच्या होत असलेल्या फैलावामुळे नागरिक रक्तदान करायला धजावत आहेत. कोरोनाची भीती नागरिकांच्या मनात बसली आहे. त्यामुळे कित्येक नागरिक रक्तदान करायला नापसंती दर्शवित असल्याची माहिती रेड क्रॉसचे माहिती अधिकारी संजय साळुंखे यांनी दिली.