शिरुर। वीजजोडणी, वीजपुरवठा खंडीत, मिटर रिडींग, अधिक वीजबिल आदींबाबत पाबळसह परिसरातील नागरिकांनी महावितरणच्या अधिकार्यांशी संवाद साधत तक्रारी मांडल्या. यावेळी पाबळसह परिसरातील विविध गावांच्या वीज जोडतीसह तक्रारी व अडचणी आदी बाबी महावितरणच्या अधिकार्यांनी ग्राहकांकडून जाणून घेतल्या. महावितरणचे अधिकारी व ग्रामस्थ यांची बैठक पाबळ ग्रामपंचायत कार्यालय येथे नुकतीच पार पडली. यावेळी अधिकार्यांनी महावितरणच्या ग्राहकांचे प्रश्न, समस्यांचे निरसन केले.
पाबळ ग्रामपंचायत कार्यालयात महावितरण अधिकारी तसेच ग्रामस्थांची बैठक पार पडली. यावेळी केंदूर, पाबळ, कान्हुर मेसाई, खेरेवाडीसह परिसरातील विविध गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. नागरिकांनी विविध अडचणींचा पाढाच वाचला. विद्युत मंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी तातडीने विजेच्या संदर्भातल्या अडचणींचे निवारण करण्याची ग्वाही नागरीकांना दिली. तसेच त्वरित कार्यवाही देखील सुरू केली. वीजबील दुरुस्ती, ट्रान्सफारमर तक्रारी, मीटर रीडिंग व इतर अडचणींबाबत तात्काळ अडचण सोडवाव्यात, अशी मागणी यावेळी अनेकांनी केली. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, शिरूर तालुका पंचायत समितीचे सभापती सुभाष उमाप यांनी वरिष्ठ अधिकार्यांना विजेच्या तक्रारी निवारण करण्याच्या सूचना दिल्या.