एरंडोल। शहराबाहेर असलेल्या नविन वसाहतींमध्ये पुरेशा प्रमाणावर सोयी व सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रहिवासी त्रस्त झाले असून पालिकेकडे अनेक वेळा तक्रारी करून देखील पालिका प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. याबाबत त्वरीत दखल घेवून नविन वसाहतींमधील समस्या सोडवाव्यात अन्यथा पालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका वर्षा राजेंद्र शिंदे यांनी पालिकेच्या मुख्याधिकार्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. पावसाळा सुरु झाला असून पावसाळ्यातील पाणी तुंबल्यामुळे अस्वच्छतेमुळे रोगराई पसरते. यातुन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. आरोग्याचा प्रश्न असल्याने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
वसाहतीतील रस्ते झाले खड्डेमय
शहराबाहेर असलेल्या नविन वसाहतींमध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. पद्मालयनगर, नम्रतानगर यासह अनेक वसाहतींमध्ये सांडपाणी वाहून जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे सर्व सांडपाणी रस्त्यावरच जमा होत असते. त्यामुळे दुर्गंधी पसरून डासांच्या प्रमाणात वाढ होवून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नम्रता नगरमधील भिका पाटील यांचे घरासमोर रस्त्यावरच सर्व सांडपाणी जमा होत असल्यामुळे पायी चालणे देखील मुश्कील झाले आहे. तसेच साईनगर परिसरात अनेक ठिकाणी पूर्ण दाबाने पाणी पुरवठा होत नसल्यामुळे राहिवाशांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. नविन वसाहतीमध्ये जाणारे रस्ते कच्चे असल्यामुळे सर्व रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात याठिकाणी पाणी तुंबून चिखल निर्माण होत असतो. चिखल व खड्यांमुळे लहान मुले व महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. नविन वसाहतींमध्ये पथदिवे नसल्यामुळे रात्री सर्वत्र अंधार राहत असल्यामुळे भुरट्या चोर्या होत असतात. अंधारामुळे महिलावर्गात भीतीचे वातावरण निर्माण होत असते.पावसाळ्यात तर या वसाहतींचा चिखलामुळे शहराशी संपर्कच तुटत असतो. तसेच नविन वसाहतींमध्ये मोकाट कुत्रे व डुकरांचा मुक्त संचार असल्यामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत.
रहिवाशांसह करणार उपोषण
ग्रामीण भागातील नागरिकांनी लाखो रुपये खर्च करून निवासस्थाने बांधली आहेत. मात्र समस्यांमुळे घरात राहण्याचे मानसिक समाधान राहिवाशाना मिळत नाही. याबाबत पालिका प्रशासनाने त्वरीत दखल घेवून पावसाळ्यापूर्वी नविन वसाहतींमधील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवावे तसेच सांडपाण्याची समस्या सोडवून रस्त्यांवर पथदिवे लावावेत अन्यथा राहिवाश्यांसह पालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका वर्षा शिंदे यांनी दिला आहे.