धुळे: राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत प्रभारत नगरातील नागरी आरोग्य केंद्राच्या बांधकामासंदर्भात संबंधीत अधिकारी दिरंगाई करीत असून वेळोवेळी निवेदने देवूनही आरोग्य केंद्राचे काम होत नसल्याने तसेच यासंदर्भात मिळणारा निधी परत जाणार असल्याने नगरसेविका नलिनी वाडिले यांनी प्रधान सचिवांकडे आयुक्तांमार्फत तक्रार सादर केली आहे.
राष्ट्रीयशहरी आरोग्य अभियानांतर्गत देवपुर परिसरातील प्रभात नगर सि.स.न.१११/११२,धुळे येथे नागरी आरोग्य केंद्राचे बांधकाम करण्याबाबत महापालिकेने संपुर्ण कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करुन ४ महिन्यांपुर्वी मे.ओम शिव कंस्ट्रक्शन,धुळे यांना कार्यादेश दिला होता. सदर ठेकेदाराने आयुक्त व कार्यकारी अभियंता यांना ५-६ वेळा लेखी पत्राव्दारे कामाचे लाईनआऊट करुन देण्यासाठी विंनंती देखील केली होती. परंतू आजपावेतो संबंधीत अधिकार्यांनी कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही व आजपर्यंत कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
दि.६ जानेवारी रोजी वृत्तपत्रातील माहितीनुसार सदर कामाचा ठेका रद्द करण्याच्या हालचाली लोकप्रतिनिधी व प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकार्यांमार्फत सुरु असल्याचे समजताच महापालिकेत चौकशी करण्यात आली. त्यानंतर आपल्या मर्जीतील ठेकेदाराला काम देण्यासाठी ही टाळाटाळ होत असल्याचे समजले असे नगरसेविका नलिनी वाडीले यांनी नमूद केले आहे. त्या अनुषंगाने आयुक्त यांची भेट घेवून सदर काम हे शासन निधीतील असल्याने ते त्वरीत सुरु करण्याची विनंती वाडीले यांनी केली आहे. १५ जानेवारी पुर्वी हे काम सुरु करण्याबाबत धुळे महापालिका प्रशासनास आदेशीत करण्यात यावे अशी विनंतीही नगरसेविका सौ.नलिनी वाडिले यांनी प्रधानसचिवांना दिलेल्या तक्रारीत केली आहे. तसे न झाल्यास दि.१६ जानेवारी पासून आयुक्तांच्या दालनासमोर उपोषणाला बसावे लागेल असा इशाराही त्यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.