वासिंद । वासिंद शहर राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीं सामाजिक न्याय विभागाच्या वतीने वासिंद पूर्व मधील पाण्याच्या टाकीची दुरुस्ती व विविध नागरी समस्या सोडवण्याबाबत एक निवेदन ग्रामपंचायतचे सरपंच व उपसरपंच यांना देण्यात आले. वासिंद पूर्व मधील पाटील नगर येथील सर्वात जुनी असलेली भलीमोठी पाण्याची टाकी जीर्ण झाली आहे. सदर टाकीचे काँक्रीटच्या पिलरमधील सिमेंटप्लॅस्टर पडून लोखंडी सळया (स्टिल) बाहेर डोकावत असून या सळया पुर्णपणे गंजल्या आहेत. तर टाकिच्या काँक्रिटला सर्वत्र तडे गेले आहेत.26 /1 /2016 रोजीच्या विशेष ग्रामसभेत सदर गंभिर बाब निदर्शनास आणूनदेखील व वारंवार पत्रव्यवहार करून पाठपुरावा करूनदेखील याबाबत गांभिर्याने विचार करून कोणतीही कार्यवाही आजतागायत करण्यात आलेली नाही. टाकीची दुर्दशा झाली असून त्यात टाकीभोवती नागरी वस्ती वेढलेली आहे. त्यामुळे टाकीचा अपघात झाल्यास भयानक हानी होऊ शकते. सदर टाकीच्या शिड्यासुध्दा गंजलेल्या असल्यामुळे कर्मचारी टाकीवर चढू न शकल्यामुळ टाकीची दैनंदिन निगासुध्दा राखता येत नाही. टाकीचे स्ट्रक्टरल ऑडिट करून गरज पडल्यास टाकी पाडून नवीन बांधण्यात यावी किंवा टाकीच्या दुरुस्तीसंदर्भात पावले उचलण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
रा. काँ. पार्टीच्या वतीने निवेदन
याशिवाय पूर्व विभागात फिल्टर पाणी योजनेचे पाणी उपलब्ध करून देणे, खेळाच्या मैदानाचे सुशोभीकरण करणे, ज्येष्ठ लोकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करणे, संपुर्ण मैदानात दिवाबत्तीची सोय करणे, मैदानाचे बंदिस्तीकरण करणे, रहदारीच्या रस्त्यावर स्ट्रिट लाइटची सोय करणे, वासिंद पुर्व रेल्वे स्टेशनजवळ हायमास्क लाईटची सोय करणे आदी नागरी मागण्यांबाबत वासिंद ग्रामपंचायतच्या कार्यालयात सरपंच लता शिंगवे व उपसरपंच विलास पाटील यांना रा. कॉ. पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी रा. कॉ. पार्टी वासिंद शहर अध्यक्ष संदीप पाटील, रा. कॉ. पार्टी सामाजिक न्याय वासिंद शहर अध्यक्ष प्रकाश वाघमारे, नगरसेवक काळूराम पवार, नगरसेविका संजना पाटील, युवा कार्यकर्ते प्रसाद दाभोळकर, संजीव पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.