नागरी समस्या सोडविण्यासाठी महापौर सरसावल्या

0

ठाणे : झोपडपट्टी विभागातील नागरिक समस्या प्राधान्य क्रमाने सोडवा असे आदेश महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे प्रभाग क्रमांक 7 च्या पाहणी दौर्यादरम्यान प्रशासनास दिले. प्रभाग क्रमांक 7 मधील करावयाच्या कामांची पाहणी करुन आवश्यक कार्यवाही करणेबाबत स्थानिक नगरसेवकांनी महापौर यांना नागरिकांच्या वतीने निवेदन दिले होते, त्यानुसार महापौरांनी प्रभागाचा पाहणी दौरा आयोजित केला होता. या पाहणी दौर्यास शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, स्थानिक नगरसेविका विमल भोईर, राधिका फाटक तर प्रशासनाचे वतीने सहाय्यक आयुक्त चारुशिला पंडित, कार्यालयीन अधिक्षक प्रकाश ईषी, कार्यकारी अभियंता रामकृष्ण कोल्हे, विलास धुमाळ, स्वच्छता निरीक्षक सौंदाने, कनिष्ठ अभियंता हर्डीकर, किरण भोये, लोकरे, कर्मचारी चोरगे व प्रभागातील कार्यकर्ते विलास मोरे, राजू फाटक, विजय दिवाटे, संतोष मोरे, प्रताप सुर्वे, स्वप्निल शिंदे, शिरीष मंडलिक, अमोल कदम, चेतन पालांडे व विभागातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

चिरागनगरमध्ये पाहणी
महापौरांनी पाहणी दौर्यामध्ये स्थानिक नगरसेवक, महापालिकेचे संबंधित अधिकारी व स्थानिक नागरिकांसमवेत प्रभाग क्र.7 मधील लक्ष्मी-चिरागनगर मधील संपूर्ण परिसराचा दौरा केला. यावेळी येथील स्थानिक नागरिकांशी चर्चा करुन आवश्यक कामे तातडीने करणेबाबत प्रशासनास महापौर यांनी आदेश दिले. यामध्ये चिरागनगर येथील चौकातील आवश्यक कामे करणे, विभागात ठिकठिकाणी पडलेले रॅबिट उचलणे, सार्वजनिक शौचालयाची आवश्यक दुरुस्ती करणे किंवा नव्याने बांधणे, गटाराची दुरुस्ती करणे, चेंबर्स दुरुस्त करणे वा नवीन बसविणे, गटारातून गेलेल्या विद्युत केबल स्थलांतर करणे, आवश्यकतेनुसार शास्त्रोक्त पध्दतीने गतिरोधक टाकणे, रस्त्याचे डांबरीकरण करणे, कल्व्हर्टची कामे करणे, व्होल्टास कंपनीच्या मागील मलबा हटविणे, जलवाहिनी टाकणे, विभागात दिवे/हायमास्ट बसविणे, सांडपाण्याचा निचरा योग्य पध्दतीने होण्यासाठी आवश्यकतेनुसार गटाराचे बांधकाम करणे, एम.एस.ई.बी.चे ट्रान्सफॉर्मर स्थलांतर करणे आदि कामे करणेबाबत सूचना केल्या.