नागादेवी तलावाच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाला ग्रामस्थांचा अल्टीमेटम

0

तर आम्हीही धर्मा पाटील व्हायचे का? प्रशासनाला विचारला जाब

यावल- सन 2006 मध्ये झालेल्या अतीवृष्ट्रिने तालुक्यातील दहिगाव-सौखेडा शिवारातील फुटलेल्या नागादेवी तलावाच्या दुरूस्तीसाठी शासनाकडे अनेक वेळा निवेदने देवूनही शासनाच्या वतीने गेल्या 12 वर्षात अनेक वेळा आश्वासने देवूनही ती पुर्ण केलेली नाही. अल्प पावसामुळे या वर्षी परीसरातील विहिरींचे पाणी खालावले असल्याने आणि जलसिंचनाकडे शासनही दुुर्लक्ष करीत असल्याने परीसरातील नागरीकांचा संताप अनावर झाला असून 11 ग्रामपंचायतीच्या वतीने येत्या पाच मार्च रोजी शेतक-यांचा भव्य मोर्चाचा इशारा दिला आहे. तो पर्यंत शासनाने तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशा आशयाचे निवदेन येथील तहसीलदार कुंदन हिरे यांना ग्रामस्थांच्या तवीने देण्यात आले. तलाव दुरुस्तीसाठी आम्हीही धर्मा पाटील व्हायचे का? असा सवाल उपस्थित करण्यात आला.

लोकप्रतिनिधींचे आश्‍वासन हवेत
तालुक्यातील नागदेवी पाझर तलाव सन 2006 च्या अतीवृष्टीत ओसंडून वाहल्याने फुटला होता.तेव्हापासून तलावाच्या दुरूस्तीच्या निधीसाठी परीसरातील ग्रामस्थांनी शासनास वारंवार निवेदने दिली. तत्कालीन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी तर प्रत्यक्ष तलावाची पाहणी करून शेतक-यांच्या हितासाठी लवकरच दुरूस्तीचे काम हाती घेण्याचे आश्श्वासन दिले होते. त्यानंतर यावल येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार, खासदार यांना बर्‍याच वेळा दुरूस्तीच्या कामासाठी ग्रामस्थांनी निधीची मागणी प्रत्येकानी आश्‍वासने दिली मात्र ती सर्व आश्वासने हवेतच जिरत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.

या पाझर तलावामुळे परीसरातील सौखेडासीम, नायगाव, चुंचाळे, बोराळे, दहीगाव, महेलखेडी, कोरपावली, मोहराळा, हरीपुरा, विरावली, नावरे या गाव शिवारातील शेकडो हेक्टर क्षेत्रतील पाण्याची पातळी कायम राहत होती मात्र गेल्या काही वर्षापासून सतत खालावत असून या वर्षात तर अल्प पावसाने 150 ते 175 फुट खोल गेली असून उन्हाळयात शेतकर्‍यांची बागायती पाण्याअभावी नष्ट होण्याची भीती निवेदनात नमूद केली आहे. सावखेडासीम , नायगाव, मोहराळे , विरावली, चुंचाळे, नावरे महेलखेडी, कोरपावली अशा 11 ग्रामपंचातीच्या सरपंचांच्या सह्यांचे निवेदन तहसीलदार कुंदन हिरे यांना देण्यात आले.