नागादेवी पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी शेतकरी एकवटले

0

यावलमध्ये आमरण उपोषण ; कामाच्या हमीनंतर उपोषण मागेचा पवित्रा

यावल :- तालुक्यातील नागादेवी पाझर तलावाच्या दुरूस्तीकरीता सावखेडासीम व दहिगाव येथील नागरीकांनी यावल तहसील कार्यालयासमोर जागतिक जल दिनाच्या दिवशीच गुरूवारी आमरण उपोषण सुरू केल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी या करीता पाझर तलाव दुरुस्त करा, अशी मागणी करीत 11 नागरिक उपोषणास बसले आहेत. त्यात चार वृध्द शेतकर्‍यांचा समावेश आहे तर 11 गावातील शेतकर्‍यांनी या उपोषणास पाठिंबा दर्शवला आहे. जिल्हा परिषद लघू सिंचन विभागाच्या अधिकार्‍यांनी या शेतकर्‍यांची भेट घेतली मात्र, काम सुरू करण्याच्या ठोस हमीनंतरच उपोषण मागे घेऊ, असा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला आहे.

12 वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही तोंडाला पुसली पाने
सातपुड्याच्या पायथ्याजवळील तालुक्यातील सावखेडासीम गावात नागादेवी पाझर तलाव आहे. 2006 मध्ये अतिवृष्टीत हा पाझर तलाव फुटला होता तेव्हापासून सतत 12 वर्ष या तलावाची दुरूस्ती व्हावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत तर दुरूस्ती करीता विविध योजनांमध्ये अंदाजपत्रक तयार झाले मात्र शासनाकडून फुटकी कवडीदेखील मिळाली नाही. त्यामुळे आता या भागातील 11 शेतकर्‍यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. यापूर्वी 11 गावातील शेतकर्‍यांनी 5 मार्च रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता.

या शेतकर्‍यांनी छेडले उपोषण
उपोषणकर्त्यांमध्ये शिवराम धोंडू पाटील (वय 91) किसन रूपचंद बडगुजर (वय 85), चुडामण गंभीर पाटील (वय 77, रा.सावखेडासीम) व आधार हैबत पाटील (वय 90, रा. दहिगाव) या चार वृध्द शेतकर्‍यांचा समावेश आहे. दहिगावचे उपसरपंच देविदास धांगो पाटील, बाळकृष्ण लटकन पाटील, शैलेंद्र सुरेश पाटील, अनिल विश्राम पाटील, कमलाकर तुळशिराम पाटील, बाबूराव भिका पाटील व रामकृष्ण शालिक पाटील हे 11 जण उपोषणास बसले आहेत.