नागोठणे ग्रामपंचायत निवडणूक : सरपंचपदाच्या तिरंगी लढतीचा नक्की फायदा कुणाला!

0

नागोठणे । पंधरा दिवस प्रचाराची रणधुमाळी झाल्यानंतर मंगळवारी प्रत्यक्षात मतदान होत आहे. सहा प्रभागांतून सहा प्रभागांतून 17 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात असून सरपंचपदासाठी शिवसेना – काँग्रेस आघाडीचे डॉ. मिलिंद धात्रक, राष्ट्रवादी काँग्रेस – शेकाप आघाडीचे लक्ष्मण उर्फ बाळासाहेब टके आणि भाजप पुरस्कृत आघाडीचे विलास चौलकर आपले जनमत अजमावत आहेत. सरपंचपद पहिल्यांदाच जनतेमधून निवडून जाणार असल्याने नागरिकांमध्येसुद्धा उत्सुकता पसरली असून या तिरंगी लढतीचा फायदा नक्की कोणाला होईल, हे 28 फेब्रुवारीच्या मतमोजणी नंतर स्पष्ट होणार आहे.

काँग्रेस सध्या येथे काहीशी दोलायमान स्थितीत असल्याने एका विशिष्ट भागातच काँग्रेस उरली आहे, असा काहींनी गोड समज करून घेतला असल्याने ग्रामपंचायतीच्या इतिहासात अनेक दशके वर्षे सत्ता उपभोगलेल्या काँग्रेसला सतरापैकी फक्त 3 उमेदवारांवरच समाधान मानत शिवसेनेबरोबर आघाडीत जावे लागले आहे. मात्र, शहरातील काही सच्चे काँग्रेसजन या आघाडीबरोबर जाणार का, हा त्यानिमित्ताने औत्सुक्याचाच विषय ठरणार आहे. बहुतांशी तरुणवर्ग शिवसेनेकडे असल्याचे स्पष्ट होत असल्यामुळे त्याचा फायदा डॉ. धात्रक आणि आघाडीच्या सदस्यांना होणार असल्याचे बोलले जात आहे.

बंडखोरी भाजपला अनायासे फायदा
येथील ग्रामपंचायत निवडणुकीत 8 हजार 270 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावून संबंधित प्रभागातील उमेदवारांसह सरपंच निवडून देणार आहेत. प्रभाग 2 हा सर्वात लहान मतदारसंघ त्यात 639 आणि प्रभाग क्रमांक 4 हा सर्वात मोठा मतदारसंघ आहे व त्यात 1 हजार 920 मतदार आहेत. दरवेळी शक्यतो दुरंगी तसेच काही अपक्ष उमेदवार उभे राहत असत. मात्र, यावर्षी शिवसेनेत बंडखोरी झाल्याचा भाजपाला अनायासे फायदा होत, त्यांचेकडूनसुद्धा पुरस्कृत उमेदवार उभे झाल्याने यावेळी तिरंगी लढत होत आहे. सध्या शिवसेनेकडे येथील ग्रामपंचायतीची सत्ता असल्याने व पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा फायदा शिवसेनेला मिळणे नाकारता येत नसल्याने सरपंचपदासह सर्वच उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जातो.

निवडणुकीला वेगळा रंगच आला असल्याची चर्चा
राष्ट्रवादी आणि शेकाप अपेक्षेप्रमाणे येथे एकत्र आले असले तरी, शेकापच्या येथील एका पदाधिकार्‍याने काही ’अर्थ’पूर्ण कारणामुळे सेनेबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला आहे. माजी ग्रा. पं. सदस्य असलेल्या बाळासाहेब टके यांना राष्ट्रवादीने एकमताने सरपंचपदाची उमेदवारी दिली आहे. डॉ. मिलिंद धात्रक आणि विलास चौलकर यांच्याप्रमाणे टके यांची जनमानसात चांगली प्रतिमा असल्याने त्याचा फायदा ते कितपत उचलतात, यावरच त्यांच्या विजयाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. भाजप पुरस्कृत उमेदवार असलेले विलास चौलकर हे सलग तीन वेळा सदस्य म्हणून निवडून आले असून त्यांनी अडीच वर्षे सरपंचपदाचा कारभार सुद्धा सांभाळला आहे. सध्या ते शिवसेनेचे रोहे तालुका संघटक पदावर कार्यरत होते. मात्र, त्यांच्या प्रभागातील एका जागेच्या वादातून त्यांनी भाजपशी सलगी करीत 6 प्रभागातील 9 उमेदवारांसह स्वतः सरपंचपदाची निवडणूक लढवत असल्याने तिरंगी लढत होत, या निवडणुकीला त्यानिमित्ताने वेगळा रंगच आला असल्याचे नागरिकांकडून बोलले जाते.