नागोठणे (राजू भिसे)। मोकाट गुरांनीं सध्या नागोठणे – पोयनाड मार्गावर बस्तान मांडले असल्याने अनेक ठिकाणी ही गुरेढोरे रस्ताच अनधिकृतरीत्या बंद करीत असल्याचे दिसून येत आहे. ही गुरे रस्ताच अडवून बसत असल्याने वाहनांना जायला मार्गच राहात नसल्यामुळे गुरांकडून एकप्रकारे रास्ता रोकोच केला जात असल्याचा अनुभव वाहनचालकांना घ्यावा लागत आहे. पावसाळ्यादरम्यान गुरांचे काही कामच नसल्याने शेतकरी काही महिने आपली गुरे – ढोरे मोकळी सोडून देत असल्याने ही गुरे जंगलात किंवा इतर ठिकाणी मोकाटपणे फिरत असतात. यातील अनेक गुरे नागोठणे – पोयनाड मार्ग पसंत करीत असल्यामुळे ते कायमचे या रस्त्यावर बस्तान मांडत असतात. विशेष म्हणजे, ही गुरे या रस्त्यालगतच्या गावांमधील असल्याचे मिळालेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे.
वाहनचालकांना सहन करावा लागतोय त्रास
रस्ता अडवल्याने आलेल्या वाहनांना रस्ता शोधण्यासाठी बराच आटापिटा करावा लागत असतो व त्यात वाहनचालकांचा बराचसा वेळ खर्ची करावा लागत असतो. काही वेळेला ही गुरे कळपाने सैरावैरा पळत असल्याने दुचाकी वाहनांना ते धोकादायक होत असते व दुचाकीस्वार काही वेळेला घसरून पडत असतात. या मार्गावर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अवकृपेने नागोठणे ते शिहू हा मार्ग खड्डेमयच राहिला असतानाच गुराढोरांच्या या रास्ता रोकोमुळे वाहनचालकांना प्रचंड असा त्रास सहन करावा लागत असला, तरी नक्की दाद मागायची तरी कोणाकडे, असा सवाल वाहनचालक व्यक्त करतात.