गोठणे। आदिवासीवाड्यांवर शुक्रवारी पडलेल्या आम्लयुक्त पावसानंतर सरकारी यंत्रणेला सोमवारी जाग आली. महसूल यंत्रणा तसेच प्रदुषण मंडळाच्या अधिकार्यांनी येथे येऊन पाहणी करीत तपासणी करण्यासाठी पाण्याचे नमुने घेऊन गेले असल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकारानंतर अनेकांना पोटदुखी तसेच डोकेदुखीचा त्रास होऊ लागल्याने काही जणांनी आज मंगळवारी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करीत औषधोपचार घेतला असून याबाबत केंद्राचे डॉ. नितीन नेटके यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हे नक्की कशामुळे झाले आहे असे कळत नसून तेथील पिण्याचे पाणी तपासणीसाठी तातडीने अलिबागला नेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहराच्या पूर्वेकडील आदिवासीवाड्यांत शुक्रवारी दुपारी रसायनमिश्रित पाण्याचा पाऊस पडला होता व त्याचा सर्वात जास्त फटका ढोकवाडी या पाड्याला बसला होता.
संबंधित प्रतिनिधीने वृत्तपत्रांच्या माध्यमातून हे प्रकरण उघड केल्यानंतर नागोठणे तलाठी सजा तसेच कृषी खात्याच्या कर्मचार्यांनी याठिकाणी जाऊन पाहणी करून पंचनामा घेतला.
प्रत्यक्षात, ढोकवाडीत न जाता भलत्याच ठिकाणी जाऊन पंचनामा करण्याचा फार्स केल्याचे उघड झाले होते. विशेष म्हणजे आतापर्यंत सरकारी यंत्रणेचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी येथे आलाच नसल्याचे या आदिवासीवाडीतील नागरिकांनी सांगितल्याने सोमवारी सायंकाळी पुन्हा एकदा संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापूर्वी प्रदुषण मंडळाचे रायगड विभागाचे अधिकारी वस्त्रे यांच्या नेतृत्वाखाली चार जणांचे पथक येथे आले होते व त्यांनी येथील पाणी तपासणी नेले असल्याचे समजते.