नाझरे जलाशयात तीन आठवडे पुरेल इतकाच पाणीसाठा

0

जेजुरी । जेजुरी आणि पूर्व पुरंदर आणि बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातील सुमारे 50 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार्‍या नाझरे जलाशयात केवळ 48 दशलक्ष घनफूट पाणीसाठा राहिला आहे. जलाशयात साधारणपणे 30 ते 35 दशलक्ष घनफूट गाळ असल्याने केवळ 10 ते 12 दशलक्ष पाणीच वापरात येऊ शकते. हे पाणी साधारणपणे दोन ते तीन आठवडेच पुरेल एवढेच आहे. त्यामुळे या जलाशयावर अवलंबून असणार्‍या गावांचाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे.यामुळे टँकरचे प्रस्ताव वाढण्याची शक्यता आहे.प्रशासनाबरोबरच शेतकरीवर्गही हवालदिल झालेला आहे.

जुलै महिन्यातील पंधरवडा संपला तरी पुरंदर तालुक्याकडे वरुणराजाने पाठ फिरवली आहे. तालुक्यातील जलाशयातून पाणीसाठे संपुष्टात आलेले आहेत.खरीप पिकेही धोक्यात आलेली आहेत. तालुक्यात मोठ्या पावसाची नितांत आवश्यकता असून पाऊस झालाच नाही तर पुरंदरला गंभीर दुष्काळाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.

जेजुरीनजीक असणार्‍या नाझरे जलाशयात केवळ 48 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक असल्याने पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या जलाशयातून जेजुरी शहर, औद्योगिक वसाहत, आय.एस.एम.टी. कंपनी, पारगाव माळशिरस व 23 गावे, नाझरे, मोरगाव आदी ठिकाणी पाणी पुरवठा केला जातो. नाझरे जलाशयात गेल्यावर्षी 18 जुलै रोजी कर्‍हा नदीतून 20 दशलक्ष घनफूट पाणी जलाशयात आले होते. तत्पूर्वी जलाशयात 58 दशलक्ष घनफूटएवढा पाणीसाठा शिल्लक होता. यावर्षी मात्र पाऊस नसल्याने कर्‍हा ही कोरडीच पडलेली आहे. गेल्या वर्षी नाझरे जलाशयाच्या परिसरात 18 जुलै अखेर 333 मिमी पाऊस झाला होता यंदा केवळ 183 मिमी पाऊस झाला आहे. नाझरे जलाशय गेल्या तीन वषार्पासून पूर्ण क्षमतेने भरलेलेच नाही. यावर्षी मात्र अजून ही पाऊस नसल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. अशीच परिस्थीती राहिली तर तालुक्याला गंभीर दुष्काळाच सामोरे जावे लागणार आहे.