जेजुरी । नाझरे धरणात अल्प पाणीसाठा आहे. या धरणातील कचरा काढून धरणपात्राची स्वच्छता करण्यासाठी जेजुरी कडेपठार पतसंस्थेने पुढाकर घेतला आहे. गुरुवारपासून या स्वच्छता कार्यक्रमाचा प्रारंभ होणार असून, जेजुरी परिसरातील नागरिक व शेतकर्यांनी या मोहिमेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कडेपठार पतसंस्थेचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांनी केले.
नाझरे धरणातून सुमारे 50 गावे, जेजुरी औद्योगिक वसाहत व शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. सध्या धरणातील पाणी तळाशी गेल्याने धरणाचा परिसर मोकळा आहे. मात्र गेली तीन वर्षे धरणातून पाणी नदीला गेले नाही. त्यामुळे धरण पाण्याबरोबर वाहून आलेला कचरा, प्लॅस्टिक, कपडे व इतर कचरा काढून टाकून धरण परिसर स्वच्छ करण्यासाठी कडेपठार पतसंस्थेने पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या मोहिमेत उद्योजक संघटनेचे अध्यक्ष डॉ. रामदास कुटे, माजी नगरसेवक मेहबूब पानसरे, नगरसेविका अमीना पानसरे, सामाजिक कार्यकर्ते बापूराव भोर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष एन. डी.जगताप आदी सहभागी होणार आहेत. जेजुरी परिसरातील इतर सामाजिक संघटना व शेतकरी यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन झेंडे पाटील यांनी केले आहे.
फक्त 8 टक्के गाळमिश्रित
नाझरे धरणाची 788 दशलक्ष घनफूट क्षमता आहे. या जलाशयामध्ये सध्या केवळ 40 दशलक्ष घनफूट म्हणजेच 4 टक्के गाळमिश्रित पाणीसाठा शिल्लक आहे. जेजुरीमध्ये देवर्शनासाठी येणारे भाविक येथे येतात. या पाणलोट क्षेत्रातच मोठ्या प्रमाणावर धर्मिक विधी चालतो. कपडे-वाहने धुणे, निर्माल्य-कपडे, प्लॅस्टिक पिशव्या बाटल्या व इतर साहित्य जलाशयामध्ये टाकले जाते. त्यातच धार्मिक विधींचा व्यवसाय करणार्या काही लोकांनी जलाशयामधील मोकळ्या जागेतच दुकाने थाटली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर धरणाच्या परिसरात कचरा साचला आहे. सध्या धरण परिसर मोकळा असल्याने कचरा काढण्याची हीच संधी आहे. यानिमित्ताने भाविक व नागरिकांमध्ये पाण्याच्या स्वच्छतेबाबत जागृती होईल, असे झेंडे पाटील यांनी सांगितले.