नाट्यगृहाच्या स्वच्छताविषयक कामांच्या निविदांमध्ये रिंग?

0

पुणे । महापालिकेच्या बालगंधर्व रंगमंदिरासह एकूण सहा नाट्यगृहे आणि सांस्कृतिक भवन येथे स्वच्छताविषयक कामे करण्याच्या निविदेतही रिंग झाल्याचे उघड झाले आहे. या कामासाठी दरमहा सर्वसाधारणपणे 1 लाख 20 रुपये खर्च येणार आहे. विशेष म्हणजे निविदा काढली असतानाही यामध्ये दर-कमी जास्त करून शिफारसी केल्या आहेत.

अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामधील अस्वच्छ स्वच्छतागृहाचे फोटो सोशल मीडियावर टाकून नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पालिकेची सर्वच नाट्यगृहे आणि सांस्कृतिक भवनातील स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावर या कामासंबंधीच्या निविदा काढण्यात आल्या. बालगंधर्व रंगमंदिर येथील स्वच्छताविषयक कामाचा मक्ता देण्यासाठी चार निविदा आल्या होत्या. त्यामध्ये विमलाई ऑल टाईप क्लीनिंग वर्क्स, संगमेश्वर केटिंरग अ‍ॅण्ड सर्व्हीसेस, तावरे पॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस, दिशा इव्हेंट्स यांनी निविदा भरल्या होत्या. त्यात विमलाई ऑल टाईप क्लीनिंग वर्क्स, संगमेश्वर केटिंरग अ‍ॅण्ड सव्र्हिसेस यांच्या निविदांचा दर पालिकेने निश्चित केलेल्या दरमहा 1 लाख 20 हजार या दरापेक्षा कमी होता. त्यामुळे त्यांच्या निविदेच्या मान्यतेची शिफारस करण्यात आली नाही. तावरे पॅसिलिटी मॅनेजमेंट र्सिव्हसेसने हे काम 1 लाख 34 हजारांमध्ये करण्याची तयारी दर्शविली. मात्र, यामध्ये ठेकेदाराचा नफा जास्त होत असल्याने यामध्ये मालमत्ता व व्यवस्थापन विभागाच्या अधिकार्‍यांनी दर कमी-जास्त केले. त्यानंतर तावरे पॅसिलिटी मॅनेजमेंट र्सिव्हसेस यांना दरमहा 1 लाख 30 हजार रुपयांना हे काम देण्याचा प्रस्ताव स्थायीपुढे ठेवला आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाच्या स्वच्छताविषयक काम लता राजाराम चव्हाण यांना दरमहा 1 लाख 20 हजार रुपयांना, तर महात्मा फुले सांस्कृतिक भवनचेही काम लता राजाराम चव्हाण यांना दरमहा 1 लाख 20 रुपयांना देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, गणेश कला क्रीडा रंगमंच, पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, राजा रविवर्मा न्यू आर्ट गॅलरी येथे स्वच्छताविषयक कामे करण्याच्या तिन्ही निविदा विमलाई ऑल टाईप क्लीनिंग वर्क्स यांना देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यासाठी या तिन्ही ठिकाणी स्वंतत्रपणे दरमहा 1 लाख 23 रुपये द्यावे लागणार आहेत.

बारगेनिंगचा अधिकार आहे का?
पालिकेने नाट्यगृह आणि सांस्कृतिक भवन यांच्या कामासाठी निविदा काढल्या. मात्र, त्यानंतर पालिकेच्या अधिकार्‍यांनी या निविदांमध्ये बारगेनिंग (कमी-जास्त दर) केले आहे. याप्रकारे यामध्ये अधिकार्‍यांना बारगेनिंग करण्याचा अधिकार आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.