नाट्यपरिषदेच्या निवडणुकीचा सामना सध्या रंगला आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे वचननामे आणि एकमेकांवरचे आरोप-प्रत्यारोप असा कलगीतुरा सध्या चालू आहे. 4 मार्च रोजी मतदान होईल आणि 7 मार्च रोजी निकाल जाहीर होईल. पण आज परिषदेकडे साडे पाच कोटींच्या मुदत ठेवी आहेत. त्यांच्या व्याजातूनच पडद्यामागील कलावंतांचा विमा, रंगकर्मी यांना वैद्यकीय मदत, एकांकिका स्पर्धांचा खर्च इतर गोष्टी करण्यात येतो. नवीन येणार्या कार्यकारिणी आणि नियामक मंडळाकडून नाट्यपरिषदेचे भवितव्य सुधारेल, अशी कामगिरी घडावी, अशी अपेक्षा सध्या करू या!
अखिल भारतीय नाट्यपरिषदेच्या नियामक मंडळाच्या 4 मार्च रोजी होणार्या पंचवार्षिक निवडणुकीत मराठी रंगभूमीवरील कलावंत निर्माते बॅकस्टेज आर्टिस्ट यांची सरमिसळ असलेल्या परस्परविरोधी पॅनल्समधील जंगी सामना रंगणार आहे. आरोप-प्रत्यारोप राजकीय निवडणुकीत स्वरूप येत आहे. मुंबई येथील मध्यवर्ती निवडणुकीच्या रिंगणात आपल पॅनल आणि मोहन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उभे असलेले मोहन जोशी पॅनल अपक्ष उमेदवार गोविंद पाटणकर राहुल भंडारे सुशील आंबेकर गीता सोमण अशी लढत रंगणार आहे. गेल्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गदारोळ झाला. निवडणूक आयुक्त आणि धर्मादाय आयुक्त यांच्या सूचना आणि आदेश यांचे पालन यथास्थित झाले असते तर हा घोळ झालाही नसता यापूर्वीही नाट्यपरिषदेच्या सभासदांची निवडणूक पोस्टल मतदानानेच होत असे. त्यावेळीही मतपत्रिका गहाळ होणे पोस्टातूनच मतपत्रिका पळवणे, असे उद्योग चालायचे. तेव्हा सभासद संख्याच कमी होती म्हणून त्यांचे प्रमाण अत्यल्प होते. परिषदेच्या सदस्य संख्येत 2013 नंतर वाढ झाल्यामुळे सत्तेवर येण्यासाठी पोस्टल मतपत्रिकांना खूप महत्त्व प्राप्त झाले. पण ज्या पोस्टल मतपत्रिका प्रक्रियेमुळे विजेत्यांच्या यशाबद्दल संभ्रमावस्था निर्माण झाली होती ती प्रक्रिया बदलण्यासाठी नाट्यपरिषदेच्या घटनेतच बदल करणे आवश्यक होते.
नाटक परिषदेचे सभासदत्व मिळाल्यापासून सभासदांच्या पत्यात बदल, लग्नानंतर महिला सभासदांचे बदललेले नाव, मृत सभासदांचे नाव यादीतून वगळणे, नूतन सभासदांना त्यांच्या आवश्यक पूर्तता कालावधीनुसार मतदारयादीत समाविष्ट करणे या सर्व गोष्टी विद्यमान कार्यकारिणीने केल्या आहेत. त्यामुळेच धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयातून नाट्यपरिषदेच्या सुधारित घटनेप्रमाणे अंतिम यादीतील मतदार प्रत्यक्ष मतदान करतील. त्यामुळे परिषदेची नवी कार्यकारिणी नियामक मंडळाचे सदस्य हे मतपेटीतून निवडले जातील. मतदानासाठी परिषदेने दिलेले ओळखपत्र शासनमान्य ओळखपत्र दाखवल्याशिवाय मतदान करता येणार नाही. अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, प्रमुख कार्यवाह यासाठी प्रत्येकी एक पद आणि संयुक्त कार्यासाठी दोन पदं अशी सदस्य संख्या कार्यकारिणी पदाधिकार्यांची होती. नूतन सुधारित घटनेनुसार आता कार्यकारिणी मंडळात दोन उपाध्यक्ष आणि तीन संयुक्त कार्यवाह पदसंख्याचे नियामक मंडळ असेल. हे कार्यकारिणी मंडळाच्या कार्यास, ठरावास मंजुरी देणारे यांच्यावर अंकुश ठेवण्याचे काम करणारे होते, तर निवडणुकीतून निवडून आलेल्या 38 प्रतिनिधी अधिक परिषदेच्या घटक संस्थांचे सात प्रतिनिधी होते. आता नियामक मंडळाची सदस्य संख्या 70 करण्यात आली आहे. यात निवडून आलेले 60 सदस्य, घटक संस्थांचे 8 प्रतिनिधी आणि 2 स्वीकृत सभासद असतील कार्यकारिणी सदस्यांची संख्या नऊवरून 11 केली आहे. नियामक मंडळावरील सदस्यांची वयोमर्यादाही आता 75 केली आहे. मोहन जोशी हे नाट्यपरिषदेचे पहिल्यांदा अध्यक्ष झाले त्यावेळी त्यांनी मच्छींद्र कांबळी यांना पराभूत केले होते.
मात्र, बदलत्या काळाप्रमाणे संदर्भही बदलतात यंदाच्या निवडणुकीत मोहन जोशी स्वतः लढत नसले, तरी त्यांच्या नेतृत्वाखाली मोहन जोशी पॅनल लढत आहे. त्यांच्याविरोधात मच्छीद्र कांबळी यांचा मुलगा (प्रसाद) नवनाथ कांबळी यांच्या नेतृत्वाखाली आपले पॅनल रिंगणात आहे. मच्छींद्र कांबळी यांच्यासोबत प्रसाद यांनी नाट्यव्यवसायात बराच काळ घालवल्यामुळे या निवडणुकीमध्ये एक तरुण अध्यक्ष नाट्यपरिषदेला मिळाला, तर नाट्यपरिषदेसाठी, रंगभूमी, रंगकर्मी यांच्या हितासाठी काम करणारं एक वेगळे नेतृत्व मिळेल. आपल्या पॅनलविरोधात निवडणूक अधिकार्यांकडे राहुल भंडारे यांनी अर्ज दिला आहे. अपक्ष म्हणून गोविंद (हरी )पाटणकर, राहुल भंडारे, सुशील आंबेकर, गीता सोमण यांनी त्यांचा वचननामासुद्धा केला. त्यात रंगकर्मी व रंगांच्या कामगारांच्या आर्थिक विकासाकडे लक्ष देणार त्याना हक्काची पतपेढी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू, असे म्हटले आहे. आवारात बॅनरबाजीवरून तक्रार अर्जही दाखल झाला. निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी अखिल भारतीय नाट्यपरिषदेच्या निवडणुकीसाठी कोणतीही लिखित आचारसंहिता नाही, असे म्हटले आहे. मात्र, निवडणूक केंद्राच्या आवारात निवडणुकीच्या 48 तास आधी प्रचार करू नये, असा सर्वसाधारण नियम असल्याचे ते म्हणाले. आपले पॅनल्सचा बॅनर यशवंत नाट्य मंदिरच्या प्रांगणात लावण्यात आला होता तो काढून टाकण्यास त्यांनी सांगितले. दोन तासांत बॅनर हटवण्यात आला. असा सामना चालू आहे. त्याचा शेवट सर्व रंगकर्मींसाठी चांगला व्हावा. हीच सदिच्छा!
-गुरुदत्त लाड
जनशक्ति, मुंबई
9820003955