जळगाव । जिल्ह्यातील सांस्कृतिक चळवळीला बळ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय नाट्य प्रशिक्षण शिबिराचे आज रविवारी सकाळी 10 वाजता पोलीस मुख्यालयाच्या मंगलम सभागृहात मान्यवरांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन समारंभासाठी शिबिर संचालक गणेश इनामदार, प्रशिक्षक श्रीकांत भिडे व उद्घाटक म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी रमेश भोळे उपस्थित होते. प्रारंभी समन्वयक विनोद ढगे यांनी मनोगत व्यक्त करताना युवा रंगकर्मींच्या प्रशिक्षणासाठी व जिल्ह्यातील सांस्कृतिक चळवळीला बळ मिळावे म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.गेल्या तीन वर्षापासुन जळगावात संपन्न होत असलेल्या राज्य नाटय स्पर्धा, बालराज्य नाटय स्पर्धा याचे उत्कृष्ठ आयोजन व नाटय रसिकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता सांस्कृतिक कार्यसंचालनालयाच्या वतीन महाएकांकिका नाटय महोत्सव व नाटय प्रशिक्षण शिबीर आयोजनासाठी जळगांवची निवड केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले.
नव्या विचारांचे रंगकर्मी
उद्घाटक रमेश भोळे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, शासनातर्फे युवा रंगकर्मीसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. हा प्रथमच करण्यात आलेला प्रयत्न आहे. यापूर्वी प्रशिक्षणासाठी युवा रंगकर्मींना आपल्या शहरातील रंगकर्मींवर अवलंबून राहावे लागत असे. मात्र या उपक्रमातून उद्याचे प्रगल्भ आणि नव्या विचाराचे रंगकर्मी शहराच्या रंगभूमीला लाभतील अशी आशा व्यक्त केली. प्रशिक्षण शिबीरासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीन नाटय व चित्रपट क्षेत्रातील नामवंत दिग्दर्शक कलावंत व तंत्रज्ञ मार्गदर्शन करणार आहे.या शिबीरासाठी पुणे येथील व नाटय दिग्दर्शक अभिनेते गणेश ईनामदार हे शिबीर संचालक म्हणुन मार्गदर्शन करणार आहे.
यांचा आहे सहभाग
सकाळी 10 ते 5 या कालावधीत जळगांव जिल्हयातील महाविद्यालयीन युवक युवतींसाठी नाटय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन पोलिस मुख्यालयाच्या मंगलम हॉल मधे करण्यात आले आहे या शिबीरासाठी जळगांवसह भुसावळ, अमळनेर, चोपडा, धुळे, नंदुरबार येथील युवा रंगकर्मींचा या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वैशाली पाटील यांनी केले.