नवी दिल्ली: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यातील सर्वात धक्कादायक आणि खळबळजनक बाब म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत. त्यानंतर अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी ही राजीनामा दिला. अजित पवार यांच्या पाठिंब्यावर भाजपने सत्ता स्थापन करण्यामागील राजकीय खेळीचा अद्याप उलगडा होऊ शकलेला नाही. दरम्यान आता या मागील खळबळजनक माहिती समोर आली आहे.
भाजपा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी महाराष्ट्राला केंद्राने दिलेले ४० हजार कोटी रुपये परत करण्यासाठी फडणवीस काही काळासाठी मुख्यमंत्री झाले होते असे देवेंद्र फडणवीसांचे नाव घेऊन सांगितले. आमचा माणूस ८० तासांसाठी मुख्यमंत्री बनला आणि राजीनामा दिला. पण हे नाट्य का केले गेलं? आमच्याकडे बहुमत नाही हे माहित असतानाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले, हा एक प्रश्न सगळेच विचारतात. मुख्यमंत्र्यांकडे जवळपास ४० हजार कोटी केंद्राकडून आलेला निधी होता. जर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्तेत आली तर या ४० हजार कोटींचा दुरुपयोग झाला असता. केंद्र सरकारच्या या पैशाचा वापर विकासासाठी केला गेला नसता म्हणून हे नाट्य केले गेले अशी खळबळजनक माहिती हेगडे यांनी दिली.
ही योजना पूर्वीपासूनच भाजपाने बनवून ठेवली होती. शपथ घेतल्यानंतर १५ तासांमध्ये फडणवीसांनी केंद्राचे पैसे परत केले. ही योजना अंमलात आणण्यासाठीच देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अशाप्रकारे फडणवीसांनी केंद्र सरकारचा सर्व पैसा वाचविला असल्याचा खुलासा त्यांनी अनंतकुमार हेगडे यांनी केला आहे.