भुसावळात प्रायोगिक खान्देश नाट्य महोत्सव
भुसावळ- शहरातील उत्कर्ष कलाविष्कारतर्फे स्व.नानासाहेब देविदास गोविंद फालक स्मृती प्रायोगिक खानदेश नाट्यमहोत्सवाला शुक्रवारी प्रारंभ झाला. शुभारंभाला सादर करण्यात आलेल्या ‘बाप हा बापच असतो’ या प्रायोगिक नाटकातून विविध नाट्यमय घडामोडींच्या माध्यमातून अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असणा-या बापाची महती सादर करण्यात आली. मध्य रेल्वेच्या श्रीकृष्णचंद्र सभागृहात शुक्रवार, 1 रोजी पक्षहवर्तन चित्र साक्षरता प्रदर्शनाचे उद्घाटन राधेश्याम लाहोटी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात राजू बाविस्कर, विकास मल्हारा व शंभू पाटील यांनी रेखाटलेली तैलचित्रे लावण्यात आली होती.
नाट्यरसिकांनी दिली दाद
ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक यांच्या हस्ते नाट्य महोत्सवाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. चेअरमन महेश फालक यांनी स्व. नानासाहेब देविदास गोविंद फालक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी राधेशाम लाहोटी, महेश फालक, अरूण मांडळकर, डॉ. आशुतोष केळकर, डॉ. दिलीप देशमुख, वैद्य रघुनाथ अप्पा सोनवणे, सौ. सविता अग्निहोत्री, पंडित सुरवाडे, प्रा. जतीन मेढे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. श्रीकांत जोशी सर यांनी केले. त्यानंतर बापाची महती विशद करणारे दोन अंकी नाटक ‘बाप हा बापच असतो’ चे सादर करण्यात आले. चंद्रभागा प्रकाशन व संजय भाकरे फाऊंडेशन निर्मित हे नाटक दोन अंकी होते. अनिता भाकरे यांचे सादरीकरण होते. लेखक व मार्गदर्शक किरण मधुकर पोत्रेकर, दिग्दर्शक संजय मधुकर भाकरे, प्रकाश योजना ऋषभ धापोडकर, संगीत केयूर भाकरे, नेपथ्य सतीश काळबांडे, सूत्रधार संकेत महाजन, आशिष पाठक हे होतो. या नाटकात राखी वैद्य, प्रतिक गान, सार्थक पांडे, शुभम सप्रे, हिमानी बल्लाळ व संजय भाकरे यांनी कलाकाराची भूमिका बजावली. नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नाटकाचा लाभ घेतला.
आज ‘जनक’ नाटकाचा प्रयोग
शनिवार, 2 रोजी रात्री 8 वाजता शार्दूल सराफ लिखीत व दिग्दर्शित ‘जनक’ नाटकाचा प्रयोग रंगणार आहे. संगीत प्रणव बडवे, प्रकाश अमोघ फडके, निर्मिती प्रमुख अपर्णा गोखले, नेपथ्य अजय पुजारे, मंचवस्तू चिन्मयी स्वामी, ऋतुजा गद्रे, मोहित कुंटे, कलाकार अनिल रसाळ, अनिता दाते, आरती मोरे, आनंद पाटील, अंकुश काणे आहेत.