नाट्यमय घडामोडीनंतर रावेरची जागा काँग्रेसकडे

0

माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांचे नाव आघाडीवर

जळगाव – जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा अखेर काँग्रेसला सोडण्यात आली आहे. तशी घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी आज केली. दरम्यान रावेर लोकसभा मतदारसंघातुन काँग्रेस पक्षातर्फे माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी दिली जाणार आहे. दरम्यान विरोधी पक्षातील उमेदवारांची चाचपणी केल्याच्या नाट्यमय घडामोडीनंतर ही जागा काँग्रेसला सुटल्यामुळे चर्चांना आता पुर्णविराम मिळाला आहे.
गेल्या महिनाभरापासून रावेर लोकसभा मतदारसंघाचा घोळ सुरू होता. जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन्ही जागा ह्या राष्ट्रवादीच्या हिश्यावर होत्या. या मतदारसंघातुन गतवेळी राष्ट्रवादीकडुन मनीष जैन यांनी उमेदवारी केली होती. मात्र त्यांना भाजपाच्या खा. रक्षा खडसे यांनी तब्बल साडेचार लाखाच्या मताधिक्याने पराभूत केले होते. तसेच हा मतदारसंघ खडसेंचा बालेकिल्ला मानला जातो. राष्ट्रवादीकडुन या मतदारसंघातुन जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, माजी आ. अरूणभाई गुजराथी आणि संतोष चौधरी या तिघांची नावे चर्चेत होती. कालांतराने अ‍ॅड. रवींद्र पाटील वगळता इतर दोघांची नावे मागे पडली. अ‍ॅड. रवींद्र पाटील यांना आत्तापर्यंत या मतदारसंघात यश आलेले नाही. त्यामुळे खडसेंच्या विरोधात कोणता उमेदवार द्यायचा यावरून काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीत चर्चेचे गुर्‍हाळ सुरूच होते. दरम्यानच्या काळात या जागेवर काँग्रेसने हक्क सांगितला. हा मतदारसंघ पुर्वश्रमीचा काँग्रेसचा गड राहील्याने तो काँग्रेसला सोडण्यात यावा अशी मागणी काँग्रेसच्या प्रदेश आणि जिल्हा पदाधिकार्‍यांनी केली होती.

नाट्यमय घडामोडी
गत १५ दिवसात रावेरच्या जागेवरून जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडत होत्या. राष्ट्रवादीकडुन पक्षातील उमेदवारांना सोडुन दुसर्‍या म्हणजेच भाजपा आणि शिवसेनेतील पदाधिकार्‍यांची उमेदवारीसाठी चाचपणी सुरू होती. मात्र अटी-शर्तींमुळे ही चाचपणी अयशस्वी ठरत होती. रावेरच्या जागेसाठी शिवसेनेचे चंद्रकांत पाटील, उद्योजक श्रीराम पाटील, अशी नावेही चर्चेत आली होती. काल राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी आ. दिलीप वळसे-पाटील जळगाव दौर्‍यावर होते. यावेळी काँग्रेसच्या प्रदेश आणि जिल्हा पदाधिकार्‍यांनी आ. वळसे-पाटील यांना रावेरची जागा सोडण्यासाठी गळ घातली. त्यानुसार वरीष्ठ पातळीवर रात्री काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्यात चर्चा झाली. या चर्चेनंतर आज आ. जयंत पाटील यांनी रावेरची जागा काँग्रेसला सोडण्याची घोषणा केली.

रावेरातुन डॉ. उल्हास पाटील प्रबळ दावेदार
काँग्रेस पक्षातर्फे माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनाच उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरापासून डॉ. उल्हास पाटील यांनी लोकसभेसाठी तयारी देखिल सुरू केली होती. तसेच सर्वार्थाने सक्षम असलेले एकमेव उमेदवार म्हणुनही त्यांच्या नावाची चर्चा होती. त्यामुळे काँग्रेस पक्षाने रावेर मधुन डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी निश्‍चीत केली आहे.

भाजपा विरूध्द काँग्रेस लढत
गत निवडणुकीत माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी अपक्ष उमेदवारी केली होती. मात्र आता काँग्रेस पक्षाचे पाठबळ त्यांना लाभले असल्याने या मतदारसंघात काँग्रेस विरूध्द भाजपा अशी सरळ लढत होणार आहे. भाजपाकडुन विद्यमान खा. रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रावेरच्या या लढतीकडेही आता लक्ष लागून राहणार आहे.