नाट्यसंमेलनाची फलनिष्पत्ती!

0

महाराष्ट्र राज्याला उत्तम असा सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसा लाभला आहे, किंबहुना या राज्याचा वैचारिक पायाच यावर आधारलेला आहे. म्हणूनच महाराष्ट्रात जसा भाषेचा महोत्सव हा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मोठा उत्साहात साजरा होतो, तसा नाट्यमहोत्सवही नाट्यसंमेलनाच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यासाठी एखाद्या जत्रेप्रमाणे साहित्य संमेलन आणि नाट्यसंमेलनाला गर्दी होत असते. या दोन्ही संमेलनांना आज आठ दशकाहून अधिक काळ लोटलेला आहे तसेच अत्यंत ज्ञानवंत साहित्यिक आणि ज्येष्ठ व श्रेष्ठ नाट्यकर्मी या दोन्ही प्रकारांच्या संमेलनाच्या अध्यक्षपदांवर आरूढ झालेले होते. त्यामुळे या संमेलनांची उंची बरीच वाढलेली आहे. कालच राज्यात उस्मानाबाद येथे 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले तसेच ठाणे येथे स्वा. सावरकर साहित्य संमेलनही पार पडले. या दोन्ही साहित्य संमेलनांचा महाराष्ट्राने मनमुरादपणे आस्वाद घेतला.

यंदाच्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर होते. ‘बॅकस्टेज कलाकार ते थेट नाट्यसंमेलनाध्यक्ष’, अशी त्यांची ओळख यानिमित्ताने अवघ्या महाराष्ट्राला झाली. रंगभूमीचा सर्व भागांचा इत्थंभूत अनुभव असलेले जयंत सावरकर यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली, ही या नाट्यसंमेलनाच्या दृष्टीने खरोखरीच जमेची बाजू ठरली. कारण मागच्या काही वर्षांपासून साहित्य संमेलन असो की, नाट्यसंमेलन असो, यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका म्हणजे राजकारण्यांना लाजवतील, अशा बनल्या आहेत. त्यामुळे याचा परिणाम म्हणून संमेलनाच्या अध्यक्षपदांची उंची खुंटलेली आहे. ज्या पदांवर एकेकाळी अत्यंत उच्च दर्जाची मंडळी आरूढ झाली होती. त्या पदांवर राजकारण्यांप्रमाणे पैशाने मते विकत घेत संमेलनाध्यक्ष पद मिळवण्याची कुप्रथा सुरू झाली होती. तसे आरोप साहित्य संमेलन असो किंवा नाट्यसंमेलन असो त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांच्यावेळी वारंवार झालेले आहेत. याच निवडणुकांच्या राजकारणामुळे ज्या नाट्यसंमेलनाच्या मागील 97 वर्षांच्या परंपरेत दादासाहेब फाळके, स्वा. वि. दा. सावरकर, चिंतामणराव कोल्हटकर, वि. स. खांडेकर, पु. भा. भावे, ग. दि. माडगुळकर, वि. वा. शिरवाडकर, भालचंद्र पेंढारकर आणि प्रभाकर पणशीकर अशा अनेक दिग्गज ज्येष्ठ रंगकर्मींमुळे नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाची उंची वाढलेली होती, त्या संमेलनाध्यक्ष पदाला दूषणे दिली गेली. त्यामुळे 2014 साली संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक न होता सामंजस्यपणे अध्यक्षाची निवड व्हावी, असा प्रस्ताव नाट्यपरिषदेने तयार केला होता. मात्र, त्याची पूर्तता झाली. परिणामी, नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक आजही होत आहे. अशा वातावरणात यंदाच्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदावर जयंत सावरकर यांची बिनविरोध निवड झाल्याने या अध्यक्षपदाची उंची कायम राखण्यात नाट्यपरिषद काही प्रमाणात यशस्वी झाली, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

तीन दिवस पार पडलेल्या या नाट्यसंमेलनाच्या आधी 5 दिवस उस्मानाबाद येथे नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात आला. त्यात प्रसिद्ध नाटकांचे सादरीकरण झाले. त्याचा उस्मानाबादकरांनी मनमुरादपणे आस्वाद घेतला. परंपरेप्रमाणे नाट्यसंमेलनात चर्चासत्रांचा रतीब न लावता यंदाच्यावेळी अधिकाधिक नाटके दाखवण्यात आली. त्यामुळे रसिकांनी नाट्यसंमेलनाचा खर्‍या अर्थाने आस्वाद घेतला. नाट्यसंमेनलाची फलनिष्पत्ती या अशाच अनेक निकषांवर अवलंबून असते. मात्र, आता ही परंपरा कायम राखणे हे नाट्यपरिषद आणि आयोजकांची जबाबदारी आहे.

संमेलने म्हटली की, नुसता मेळावा आणि त्यानिमित्ताने विरंगुळा अशी ओळख साहित्य संमेलन असो किंवा नाट्यसंमेलन असो यांची बनली आहे. कारण त्यातून त्या-त्या क्षेत्रासाठी भरीव अशी कामगिरी होताना दिसत नाही. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून जसे मराठी भाषेचे संवर्धन होणे, त्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करणे अपेक्षित आहे तसेच नाट्यसंमेलनाच्या माध्यमातून नाट्यक्षेत्राचा विकास होणे अपेक्षित आहे.

अशा संमेलनाच्या माध्यमातून साधकबाधक चर्चा होऊन पुढील वर्षासाठी योग्य कृती आराखडा त्यानिमित्ताने होणे गरजेचे आहे. त्यासाठी या क्षेत्रांतील तज्ज्ञांनी या संमेलनांच्या माध्यमातून एकत्र बसून विचारविनिमय करण्यासाठी ही संमेलने कारणीभूत ठरली पाहिजेत. मात्र, दुर्दैवाने आता साहित्य संमेलन किवा नाट्यसंमेलन म्हटले की, सरकारी अनुदान आणि ती मिळवण्यासाठी राजकारण्यांचा संमेलनांच्या व्यासपीठावर पाहुणचार, असे चित्र निर्माण झाल्याचे दिसते. हे चित्रही बदलणे गरजेचे आहे अन्यथा 97 व्या नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांनी गैरहजेरी लावली म्हणून संमेलनाच्या आयोजकांनी इतके दुःखी होण्याची गरज नव्हती.