पुणे । दरवर्षीच्या नाट्यसंमेलनात कोणत्या ना कोणत्या विषयावर वादंग होतात आणि मानापमानाचे अनेक अंक रंगतात. मात्र यंदा मुंबईत होणार्या 98 व्या नाट्यसंमेलनात मात्र या नाट्यबाह्य वादंगांना बाजूला ठेवत बैठकीचे नाटक रंगणार आहे. नियोजित नाट्यसंमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार या त्यांनीच अभिनित केलेल्या ‘संगीत स्वरसम्राज्ञी’ या गाजलेल्या संगीत नाटकाचे ’बैठकीचे नाटक’ सादर करणार आहेत. त्यामुळे वादविवादांचे सुरुंग फुटण्याऐवजी संमेलनात सुरेल नाट्यसंगीत रंग उधळले जाणार आहेत.
यंदा नाट्यसंमेलनाचे 98 वे वर्ष आहे. शिवाय नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांचा स्मृतिदिन 14 जून रोजी आहे. नाट्यसंमेलन 13 ते 15 जून दरम्यान मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यगृहात होणार आहे. दरवर्षी नाट्यपरिषदेच्या वतीने 14 जून हा देवल स्मृतीदिन म्हणून साजरा केला जातो. नाट्यक्षेत्रातील स्पृहणीय कामगिरीसाठी पुरस्कार दिले जातात. यंदा त्यासोबत देवलांना अभिवादन करण्यासाठी ययाती आणि देवयानी या संगीत नाटकातील काही भागाचे सादरीकरण करावे, अशी सूचना नाट्य परिषदेला केली आहे, असे कीर्ती शिलेदार यांनी सांगितले..
संमेलनाच्या अध्यक्षपपदाची जबाबदारी असली, तरी मुळात मी संगीत रंगभूमीवरील गायिका-अभिनेत्री असल्याने संमेलनासाठी येणार्या रसिकांसमोर नाट्यसेवा रुजू करणे, हेही माझे कलावंत म्हणून कर्तव्यच आहे. त्यासाठी यंदा संगीत स्वरसम्राज्ञी या नाटकाचे बैठकीच्या नाटकात रूपांतर केले आहे. हे बैठकीचे नाट्य मी आणि ज्ञानेश पेंढारकर सादर करणार आहोत, असे त्या म्हणाल्या.
जोमाने प्रयत्न सुरू
नाट्यपरिषदेची सर्व कार्यकारिणी नव्याने निवडून आली आहे आणि नाट्यसंमेलनाच्या तयारीसाठी जोमाने काम सुरू झाले आहे. सध्या कार्यक्रमांची रूपरेषा ठरविण्याचे काम सुरू आहे. राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद स्वीकारले आहे. राज्य सरकारचे सर्व प्रकारचे सहकार्य त्यांच्या रूपाने संमेलनाला मिळेल, याचा विश्वास आहे.
– प्रसाद कांबळी, अध्यक्ष, नाट्य परिषद