‘नाच रे मोरा’ला प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद : नाट्य संस्कार कला अकादमीच्या वतीने आयोजन
पुणे : ग. दि. माडगूळकर यांच्या लहानपणीचा संघर्षमय प्रवास व त्यातून आपल्याला लाभलेला हा बुद्धिमान, दैदिप्यमान कवी, लेखक, दिग्दर्शक कसा घडला हे पाहण्याची सुवर्ण संधी पुणेकरांना मिळाली. त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने नाट्य संस्कार कला अकादमीच्या वतीने पुणेकरांना लाभली. विख्यात मराठी कवी व पटकथा-संवाद-लेखक, गीतरामायणकार ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे नाट्य नृत्य संगीतमय कार्यक्रम नाच रे मोराचे आयोजन करण्यात आले होते. कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला.
35 कलाकार आणि 15 गाणी
या कार्यक्रमाचा पुरेपूर लाभ घेत रसिक प्रेक्षकांनी नाट्यगृह तुडूंब भरले होते. गदिमांच्या बालपणावर प्रकाश टाकणारा हा कार्यक्रम असून त्यांनी लिहिलेल्या गीतांवर आधारित होता. तब्बल 35 कलाकार आणि 4 गायिकांनी गायलेली 15 गाण्यांनी कार्यक्रमाला शोभा आणली. नाच रे मोरा, झुक झुक अगीनगाडी, दादा मला एक वाहिनी आण या गाण्यांवरील नयनरम्य नृत्य रसिक प्रेक्षकांना भावले. या कार्यक्रमाला आ. मेधा कुलकर्णी आणि श्रीधर माडगूळकर प्रमुख पाहुणे उपस्थित होते. नाच रे मोरा चे लेखन गदिमा यांची नात लीनता माडगूळकर-आंबेकर यांनी केले आहे. दिग्दर्शन अशोक आडावदकर यांनी केले आहे. या कार्यक्रमाची संकल्पना दिपाली निरगुडकर यांची तर सूत्रधार नाट्य संस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी आहेत.
विस्मृतीत गेलेल्या गोष्टी समोर…
नाच रे मोरा या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे रसिक प्रेक्षकांच्या मनात गदिमांचे स्मारक नक्कीच तयार होत असल्याचे आमदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितले. असे कार्यक्रम भविष्यात जास्तीत जास्त व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. गदिमांचे बालपण, त्यांचा लेखक, दिग्दर्शक प्रवास, त्यांनी केलेल्या कविता, गाण्यांच्या आधारे नृत्य आणि नाट्य स्वरूपात पाहण्याची संधी मिळाली. नाट्यसंस्कार कला अकादमीसारखी संस्था असे कार्यक्रम करून गदिमांच्या विस्मृतीत गेलेल्या गोष्टी नव्याने आजच्या तरुण पिढीला जाणीव करून देत आहे. अशा कार्यक्रमाच्या पाठीमागे शासनाने खंबीरपणे तसेच आर्थिकदृष्ट्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचे श्रीधर माडगूळकर यांनी सांगितले.