उस्मानाबाद । अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला 21 एप्रिलपासून सुरूवात होत आहे. या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असून समारोपास शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर पालकमंत्री आणि सहपालकमंत्र्यांनाही नाट्य संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या उस्मानाबाद 97 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार आहे.
विविध कार्यक्रमाचेही केले आयोजन
21 एप्रिल रोजी सायंकाळी 4.30 वाजता नाट्यदिंडीस प्रारंभ होणार आहे. नाट्यदिंडीचे आगमन तुळजाभवानी क्रीडा संकुलातील मुख्य रंगमंचावर झाल्यानंतर सायंकाळी 6 वाजता फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटनाने नाट्य संमेलनास सुरूवात होणार आहे. उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबरच जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते, सहपालकमंत्री तथा दुग्ध आणि पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनाही संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.नाट्यसंमेलनापूर्वी व्यावसायिक नाट्यमहोत्सवाने उस्मानाबाद शहरात विविध कार्यक्रमांची मेजवानी रसिकश्रोत्यांना मिळणार आहे. 21 एप्रिल रोजी मुख्य संमेलनास प्रारंभ होवून 23 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता खुल्या अधिवेशनाने नाट्यसंमेलनाचा समारोप होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्याचबरोबर विविधपक्षांतील सन्माननीय लोकप्रतिनिधींनाही संमेलनातील निमंत्रण पाठविण्यात आले आहे.