खासदार श्रीरंग बारणे यांची टीका
पिंपरी : बांधकाम कामगार अत्यंत हालाखीचे जीवन जगत असताना कामगार कल्याण निधी शासनाकडे पडून आहे. परिणामी कामगारांना सोई सुविधा देण्यात आडकाठी येत आहे. कामगारांविषयी अनास्था असलेल्या नाठाळ भाजप सरकारला महाराष्ट्र मजदूर संघटनाच ताळ्यावर आणेल, असा विश्वास शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला. शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेच्यावतीने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेतंर्गत अवजारे खरेदी करण्यासाठी बांधकाम कामगारांना खासदार बारणे यांच्या हस्ते अर्थसहाय्य करण्यात आले. कार्ला येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. यामध्ये 200 कामगारांना प्रत्येकी 5 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. त्यावेळी खासदार बारणे बोलत होते.
महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष आणि भारतीय कामगार सेना महासंघाचे उपाध्यक्ष इरफान सय्यद, अप्पर कामगार उपायुक्त बाळासाहेब वाघ, सरकारी कामगार अधिकारी रोहन रुमाले, सरकारी अधिकारी यास्मिन शेख, मुजावर, संगीता कळमकर, शिवसेना तालुका प्रमुख राजेश खांडभोर, उपसभापती शरद हुलावले, सरपंच सागर हुलावळे, सुदाम हुलावळे, विष्णू हुलावळे, तोफील शेख, रवी जंगम, महेश दळवी, गोविंद वायकर, विकास वायकर, दिलीप भालेराव, अनंता यादव, गिरीश सातकर, उपतालुकाप्रमुख मदन शिर्के, बब्रु ठोंबरे, महिला तालुकाध्यक्षा आशा देशमुख, तालुका सल्लागार भारत ठाकूर, माजी उपतालुका प्रमुख सुरेश गायकवाड, भिवाजी वाजी वाटेकर, परेश मोरे, प्रवीण जाधव, शरद हुलावळे, उज्वला गर्जे, महेश हुलावळे, सुनील जवळकर, पांडुरंग कदम, सतीश कंठाळे, दत्तगीर मणियार, तुकाराम हुलावळे, अजय ठोंबरे, प्रितेश शिंदे, प्रदीप धामणकर आदी उपस्थित होते.
‘तो’ निधी उपलब्ध व्हावा
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, बांधकामांना परवानगी देताना नियोजित बांधकामाच्या खर्चाच्या एक टक्का रक्कम ‘सेझ’ अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांकडे जमा करण्यात येते. हा जमा होणारा पैसा कामगारांच्या हितासाठी वापरण्यात यावा, असा शासनाचा मानस आहे. मात्र हा पैसा कामगारांना मिळवून देण्यासाठी कोणीही प्रयत्न करीत नाही. त्यामुळे सध्या शासनाकडे ‘सेझ’अंतर्गत 10 हजार कोटी रुपयांचा निधी पडून आहे. मात्र, त्याचा लाभ कामगारांना व्हावा यासाठी शासनाची उदासिनता दिसून येत आहे. हा निधी तळागाळातील कामगारांपर्यंत पोहचावा यासाठी महाराष्ट्र मजदूर संघटना सातत्याने कटिबद्ध राहील.
गरजू कामगारांची नोंदणी केली
शिवसेनेचे कामगार नेते इरफान सय्यद म्हणाले की, महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने बांधकाम साईटवर जाऊन कामगारांची नोंदणी केली आहे. त्यामुळे केवळ गरजू आणि खर्या कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. नोंदणीकृत कामगारांसोबत संघटना सातत्याने संपर्क करीत आहे. त्यांच्या अडचणींना सोडविण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. संघटना केवळ कामगारांसाठी न लढता त्यांच्या कुटुंबीयांना देखील विविध योजना मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती, पुस्तक खरेदीसाठी मदत तसेच व्यसनमुक्ती आणि साक्षरता वर्गदेखील चालविले जात आहेत. कामगारांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे. अप्पर कामगार उपायुक्त बाळासाहेब वाघ यांनी शासनाकडून कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांविषयी माहिती दिली. तसेच सर्व कामगारांनी शासनाकडे नोंदणी करावी, ज्यामुळे त्यांना वेळोवेळी शासनाकडून मदत मिळू शकेल, असेही वाघ म्हणाले. सर्जेराव कचरे यांनी प्रास्ताविक केले. उज्वला गर्जे यांनी आभार मानले.
राज्यातील पथदर्शी उपक्रम
नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या खात्यावर साहित्य खरेदीसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याचा राज्यातील पहिलाच उपक्रम महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या सहकार्याने राबवण्यात आला. आत्तापर्यंत दोनशे कामगारांना त्याचा थेट लाभ मिळाला आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. शहरात कामगारांच्या प्रश्नांवर काम करणार्या भरपूर संस्था आहेत. परंतु, त्यातल्या बहुतांश संस्था खुद्द कामगारांनाच लुटण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र मजदूर संघटना खर्या अर्थाने कामगारांच्या न्याय-हक्कासाठी लढत आहे. संघटनेच्या वतीने कामगारांच्या खात्यावर पैसे मिळवून देण्यात आले. त्यानंतर त्याबाबत सांगण्यात आले आहे. त्यामुळे आधी केले मग सांगितले, याप्रमाणे संघटना काम करत असल्याचे गौरवोद्गार बारणे यांनी काढले.