बोदवड : तालुक्यातील नाडगाव येथे बंद घरातून चोरट्यांनी दागिन्यांसह अन्य सामानाची चोरी केली होती. या प्रकरणी बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बोदवड पोलिसांनी या प्रकरणी दोघा आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून घरफोडीत चोरी गेलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. देविसिंह उर्फ दीपक गोपाळ राजपुत (राणा) व प्रशांत मोहन नारखेडे (दोन्ही रा.नाडगाव, ता.बोदवड) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून अटक
नाडगाव गावातील शंकुतला संजय पाटील यांच्या घरी 17 रोजी घरफोडी झाली होती. या प्रकरणी बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक, राहुल गायकवाड यांना घरफोडीबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर संशयीत देविसिंह राजपूत व प्रशांत नारखेडे यांना अटक करण्यात आली. आरोपींनी साथीदार चेतन प्रल्हाद नेहते (रा.नाडगाव) सोबत मिळून घरफोडीची कबुली दिली. आरोपींनी ऐनगाव येथेदेखील प्रतिभा कृषी केंद्र फोडत रोकड लांबवल्याची कबुली दिली असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उप.विभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सचिन चौधरी, शशीकांत महाले, निखील नारखेडे, मुकेश पाटील, तुषार इंगळे, निलेश सिसोदे, चालक वसीम तडवी व महेंद्र लहासे आदींच्या पथकाने केली.
तपास पोलीस नाईक शशीकांत महाले व सचिन चौधरी, निखील नारखेडे करीत आहेत.