लाखो लिटर शुद्ध पाण्याचा अपव्यय ; दुष्काळात तेराव्या महिन्याचा अनुभव
बोदवड- तालुक्यातील नाडगाव येथील धरम मळा वस्तीत मंगळवारी पहाटेच्या सुमारास बोदवड भागात पाणीपुरवठा करणारी ओडीए योजनेची पाईपलाईन अचानक फुटल्याने लाखो लिटर शुद्ध पाण्याचा अपव्यय झाला. काही दिवसांपूर्वीच आमदगाव रस्त्यावरील ओडीए योजनेची पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर शुद्ध पाण्याचा अपव्यय झाला होता. एकीकडे कालबाह्य योजनेमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असताना दुसरीकडे मात्र नाडगावसह नांदगाव ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
चार वर्षांपासून दुष्काळाच्या झळा
बोदवड तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाला असून तालुक्यात गेल्या पाच ते सहा वर्षांपासून समाधानकारक पाऊस झालेला नाही तर गेल्या चार वर्षापासुन सलग दुष्काळाची झळ बोदवड तालुक्याला बसतेय. गेल्या पाच वर्षापासुन पावसाने दांडी मारलेल्यानंतर यंदाही उन्हाळयात पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती होत असल्याचे चित्र आहे. तालुक्यात कुठल्याही जलसिंचन योजना नसल्याने विहिरींच्या भुजल पातळ्या अतिशय खोलवर गेल्या आहेत. जलस्तर खालावल्याने विहिरी आटल्या तर परीसरातील बोअरवेलसारखी यंत्रणा कुचकामी ठरत आहे. विविध समस्या पाहता ऐन उन्हाळ्यात नागरीकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दुष्काळ निवारण पथकाचेही सातत्याने दुर्लक्ष दिसत होत पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाकडुन किती टँकर पाठवले जातात याबाबतही संभ्रम आहे. नाडगाव व नांदगाव येथे गेल्या महिन्यातून एकच वेळा पाणीपुरवठा होत असल्याने नागरीकांचे पाण्याअभावी अतोनात हाल होत आहे. गुरांच्या हौदातीलही पाणी गावकरी दैनंदिन वापरासाठी नेत असल्याने पाणीप्रश्न गंभीर समस्या बनली आहे.
गुरांच्या हौदातील पाण्याचाही होतो वापर
गावातील ग्रामपंचायत परीसरात गुरांना पाणी पिण्यासाठी हौद उभारला आहे. परीसराला लागुन गावातील चार वॉर्डापैकी 1 ,2 हे दोन वार्ड आहेत. गुरांचा हौद भरण्यासाठी ओडीए योजनेचे पाणी सोडले जाते मात्र हौदातील पाण्याचादेखील धुणे धुण्यासाठी वापर केला जातो शिवाय दैनंदिन वापरासाठी हे पाणी नेले जात असल्याने पाणीप्रश्नाने येथे उग्र रूप धारण केले आहे.